सोलापूर : राष्ट्रीयीकृत बँकांकडे कर्जासाठी जाणाऱ्या बळीराजाला आता जिल्हा मध्यवर्ती बँक दोन ते पाच लाखांचे मॉरगेज कर्ज देणार आहे. विकास कार्यकारी सोसायट्यांशिवाय बँक निरीक्षकांच्या माध्यमातून हे कर्जवाटप केले जाणार आहे.
बँकेची 102 वी वार्षिक सर्वसाधारण सभा लोकनेते बाबुरावआण्णा पाटील सभागृहात पार पडली. या सभेत हा निर्णय घेण्यात आला असून त्यासंदर्भात आता धोरण निश्चितीचे काम सुरु झाले आहे.प्रशासक शैलेश कोथमिरे, सरव्यवस्थापक किसन मोटे, बँकेचे व्यवस्थापक के. आर. पाटील आदी उपस्थित होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बँक पातळीवर शंभर टक्के व संस्था पातळीवर 50 टक्के अथवा त्याहून अधिक वसुली आहे, अशा संस्था सभासदांना एक लाखांपर्यंत कर्जवाटप करते. परंतु, बँकेने ही कर्ज मर्यादा आता वाढवून तीन लाख केली आहे. तर शेतकऱ्यांच्या मागणीनुसार राष्ट्रीयीकृत बँकेप्रमाणेच जिल्हा बँकेतर्फेदेखील शेतकऱ्यांना थेट मॉरगेज कर्ज देण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला. शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकांच्या धर्तीवर शाखा स्तरावरच आता थेट कर्ज उपलब्ध करुन देण्याचा निर्णय यावेळी झाला.
* अशी असेल प्रक्रिया
एखाद्या शेतकऱ्याने बँकेच्या कोणत्याही शाखेकडे मॉरगेज लोनची मागणी केल्यास संबंधित शेतकऱ्याची मालमत्ता, शेतातील पिकांची पाहणी संबंधित बँक निरीक्षक करेल. बँक निरीक्षकाची खात्री झाल्यानंतर त्या शेतकऱ्याने मागणी केलेला कर्जाचा अर्ज बँकेच्या मुख्य शाखेकडे पाठविला जाईल. त्यानंतर बँक त्या शेतकऱ्याला कर्जवाटप करणार आहे. नियमित कर्जदार, नवे सभासदांनाच अशाप्रकारचे कर्ज मिळणार आहे.
“सर्वांच्या प्रयत्नतूान बँक पुन्हा पूर्वपदावर येऊ लागली असून थकबाकी व येणेबाकी वसुलीसाठी सर्वांनी मिळून काम करण्याची गरज आहे”
शैलेश कोथमिरे – प्रशासक