पुद्दुचेरी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या लग्नाच्या विषयावरून देशभरात उलट-सुलट चर्चा होत असतात. त्यात विरोधक सुद्धा हाच मुद्दा घेऊन अनेकवेळा राहुल गांधी यांच्यावर टीका करताना आढळून आले आहेत. राहुल गांधी यांची प्रेयसी आहे का यासंदर्भातील कोणतीही माहिती उपलब्ध नसून खुद्द राहुल गांधींनीही कधी यासंदर्भात उघडपणे खुलासा किंवा वक्तव्य केले नाही. मात्र एका कार्यक्रमात परत एका मुलीने हाच सवाल केला. यावर राहुल गांधींनीही पद्धतशीर उत्तर देणे टाळले.
मात्र आता एका कार्यक्रमात एका मुलीनेच या विषयी राहुल गांधी यांना विचारले आहे. पुद्दुचेरीमधील एका कार्यक्रमामध्ये राहुल गांधींनी शाळेतील मुलांशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधी हे वेगळ्या रुपामध्ये दिसून आले. सामान्यपणे सफेत कुर्ता आणि पायजमा या राजकीय नेत्याच्या वेशात असणारे राहुल गांधी निळ्या रंगाचा टीशर्ट आणि पॅण्ट अशा एकदम यंग लूकमध्ये मुलांशी संवाद साधण्याच्या कार्यक्रमात पोहचले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या कार्यक्रमामध्ये मुलांनी राहुल यांना त्यांच्या खासगी आयुष्यासंदर्भातील अनेक प्रश्न विचारले. याचदरम्यान एका मुलीने राहुल यांना, ‘सर’ असं म्हटलं असता त्यांनी, ‘माझं नाव सर नसून राहुल आहे,’ असं म्हटलं आणि त्यानंतर मुलांनी टाळ्या वाजवण्यास सुरुवात केली. ‘तुम्ही तुमच्या मुख्यध्यापकांना सर म्हणा. मला हवं तर तुम्ही राहुल अण्णा असे म्हणू शकता,’ असं राहुल यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं.
राहुल यांना सर म्हणणाऱ्या मुलीने आपला प्रश्न पूर्ण करत, ‘तुम्हाला गर्लफ्रेंड आहे का?,’ असं विचारलं. या मुलीने विचारलेला प्रश्न ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. राहुल यांनी या प्रश्नाला हसून उत्तर देताना, ‘या प्रश्नाचं उत्तर मी एखाद्या वेगळ्या दिवशी देईन,’ असे म्हटले. राहुल यांनी या प्रश्नाला थेट उत्तर देणे टाळले.