अमरावती : अमरावतीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर अमरावतीमधील लॉकडाऊन आणखी वाढवण्यात आला आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी हा निर्णय घेतला. आधी २२ फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं होतं. परंतू आता सात दिवस आणखी लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. अमरावती, अचलपूर शहर आणि अंजनगाव सूर्जी शहरात ८ मार्च सकाळी सहा वाजेपर्यंत लॉकडाऊन असेल.
विदर्भात सध्या अमरावतीमध्ये करोनाने थैमान घातले असून रुग्णवाढ कायम असल्याने व गेल्या पाच दिवसांत ३२ बाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील अमरावती शहर आणि अचलपूर शहरात लॉकडाऊन आणखी सात दिवसांसाठी वाढवण्यााचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, अंजनगाव सुर्जी हे शहरच कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले असून तिथेही प्रतिबंधात्मक आदेश कायम असणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी माहिती दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अमरावती जिल्ह्यात २२ फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे. हा लॉकडाऊन सोमवारी संपणार असून अमरावती शहर आणि अचलपूर शहरात ८ मार्चपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय आज जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊन काळात केवळ अत्यावश्यक सेवा व वस्तूच उपलब्ध असतील. बाकी सर्व व्यवहार पूर्णत: बंद राहतील. त्यात शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कोणत्याही कार्यक्रमास परवानगी नसेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय अमरावती विभागातील अकोला, वाशिम, बुलडाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यांत करोनाची साखळी तोडण्यासाठी अनेक प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आलेले आहेत.
अमरावती व अचलपूरमध्ये करोनाची स्थिती गंभीर बनत चालली आहे. लॉकडाऊन असतानाही रुग्णवाढ कमी झालेली नाही. दररोज मोठ्या संख्येने नवीन रुग्णांची भर पडत आहे. शहरी भागात संसर्गाचा प्रादुर्भाव सर्वाधिक आहे. ही बाब ध्यानात घेऊनच येथील लॉकडाऊन आणखी सात दिवसांसाठी वाढवण्यात आला आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून नमूद करण्यात आले आहे. मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि सतत हात धुवा असे वारंवार आवाहन करूनही अनेक नागरीक बेजबाबदारपणे वागताना दिसत आहेत. त्यामुळेच लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागत असून सात दिवसांनंतर पुन्हा स्थितीचा आढावा घेण्यात येईल. करोनाविषयक त्रिसूत्री पाळा आणि लॉकडाऊन टाळा असे आम्ही वारंवार नागरिकांना सांगत आहोत. त्यामुळे ८ मार्चनंतर लॉकडाऊन हवा आहे की नको, हे नागरिकांवरच अवलंबून असेल, असा इशाराही जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.