पुणे : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके आढळणे हे घडवून आणलेले षडयंत्र असल्याचे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून अंबानी आणि अदानी हे शेतकऱ्यांच्या, तसेच सर्वसामान्य नागरिकांच्याही रोषाला पात्र ठरले आहेत. स्फोटकांचे प्रकरण घडवून आणल्याने आपल्याला सहानुभूती मिळेल असे त्यांना वाटत आहे. मात्र असे काहीही रोणार नाही, असे शेट्टी म्हणाले.
माजी खासदार राजू शेट्टी हे पुण्यातील एका कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी सीबीआयचा राजकीय वापर होत असल्याचे सांगत सरकारवर निशाणा साधला. सीबीआयने राजकीय कामांकडे लक्ष देत राहण्यापेक्षा ही स्फोटके आली कुठून, याचा शोध घेण्याची गरज आहे, असेही शेट्टी म्हणाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यांनी केंद्रीय कृषी कायद्यावर देखील भाष्य केले आहे. केंद्रीय कृषी कायद्यांचा फटका हा शेतकऱ्यांना तर बसणार आहेच. पण तो सर्वसामान्य नागरिकांना देखील बसणार असल्याचे शेट्टी म्हणाले. या कृषी कायद्याचे लाभधारक १५ ते १६ जण असल्याचेही ते म्हणाले. अशा लाभधारकांपैकी अदानी आणि अंबानी हे पुढे आले आहेत. मात्र दोघांपैकी एक असलेल्या अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके आढळली. मात्र, यावरून हे घडवून आणले गेले आहे का, असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे शेट्टी म्हणाले.
अशा प्रकारची स्फोटके मुंबईत येत असताना गुप्तचर यंत्रणा काय करत होती?, मुंबई पोलिस काय करत होते?, केंद्रीय यंत्रणा काय करत होत्या?, असे एकावर एक प्रश्न राजू शेट्टी यांनी उपस्थित केले आहेत. आपल्या या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलिसांनी आणि केंद्रीय गुप्तचर विभागाने द्यावीत, असे आवाहन शेट्टी यांनी केले आहे.