मुंबई : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात वाढत्या दबावानंतर वनमंत्री संजय राठोड यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यातच आता ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जे केले तेच शरद पवारांनी करायला हवे होते. त्यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा’, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, असंही ते म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उशिरा का होईना वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतला त्याचं आम्ही स्वागत करतो. राष्ट्रवादीचे अध्यक्ष व शरद पवार यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत तेच करायला हवं होतं. त्यांनीही मुंडेंचा राजीनामा घ्यायला हवा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
चंद्रकांत पाटील यांनी एका माध्यम वाहिनीशी बोलताना ही मागणी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच राठोड यांचा राजीनामा घ्यायला हवा होता. ते प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वारस आहेत. त्यानुसार आधीच ठाकरी बाणा दाखवायला हवा होता, असं सांगतानाच उद्धवजींनी जे केलं ते शरद पवार यांनाही मुंडे प्रकरणात करता आलं असतं. त्यांनी मुंडेचा राजीनामा घ्यायला हवा होता, असं पाटील म्हणाले.
* न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा
पूजाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करत राहणार आहोत, असंही ते म्हणाले. राष्ट्रवादीचे मेहबूब शेख प्रकरण असो किंवा धनंजय मुंडे प्रकरण असो या प्रकरणात सरकारने वेगवेगळी भूमिका घेतली आहे. हे योग्य नाही, असंही त्यांनी सांगितलं.
* एफआयआर दाखल झाला पाहिजे
विरोधी पक्ष, मीडियासह सर्वांनीच पूजा चव्हाण प्रकरणी आवाज उठवल्यामुळे राठोड यांचा राजीनामा घेण्याशिवाय मुख्यमंत्र्यांकडे काहीच पर्याय उरला नव्हता, असं सांगतानाच या प्रकरणात आता एफआयआर दाखल झालाच पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. हा राजीनामा पहिल्याच दिवशी घ्यायला हवा होता. मोठ्या दबावामुळे राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला असून या निमित्ताने सरकारचा खरा चेहरा उघड झाला आहे, असंही ते म्हणाले.