मुंबई : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी वाढत्या दबावानंतर महाराष्ट्राचे वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर 20 दिवसांच्या नाट्यानंतर राजीनामा दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी राठोड यांनी सपत्नीक भेट घेतली. यानंतर राठोड यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला. मुख्यमंत्र्यांनीही हा राजीनामा स्वीकारला. मलाही माध्यमांना उत्तर द्यावे लागते, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा मंजूर केला. ठाकरे मंत्रिमंडळातील पहिली विकेट आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी अखेर शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागले आहे. राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपुर्द केला आहे. मुख्यमंत्र्यांनी राठोड यांचा राजीनामा मंजूर केला आहे. संजय राठोड यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेनेला मोठा झटका मानला जात आहे.
आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर जाऊन राठोड यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द केला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
‘मी राजीनामा देतो पण चौकशी पुर्ण होऊ द्यात. त्यात मी दोषी आढळलो तर माझा राजीनामा मंजूर करा.’ अशी विनंती राठोड यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. यावेळी संजय राठोड प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाल्यानंतर राजीनामा घ्यावा, अशी विनंती एकनाथ शिंदे यांनी केली होती. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या निर्णयावर ठाम होते, अखेर त्यांनी संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात आत्महत्या केली होती. त्यानंतर पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांच्यातील संभाषणाच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. त्यामुळे भाजपने संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा संजय राठोड यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे खुद्द राठोड यांनीच राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. अखेर संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे.
* पूजाला न्याय मिळावा म्हणून, तिची आजी संजय राठोडांविरोधात तक्रार करणार
पूजा चव्हाण हिला न्याय मिळावा म्हणून आता तिची आजी पुढे आली आहे. पूजाची आजी शांताताई राठोड आज गुन्हा दाखल करणार आहे. शिवाय त्या पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत. एफआयआर मध्ये मंत्री संजय राठोड यांचेही नाव टाकणार असल्याचे त्या म्हणाल्या. शांताबाई या महिला अधिकारांसाठी लढणाऱ्या तृप्ती देसाई यांच्या मदतीने वानवडी पोलिस स्टेशनला जाणार आहे.
* पोहरादेवी महंतांचा थेट शिवसेनेला इशारा
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संशयीत राज्याचे वनमंत्री संजय राठोड राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण, पोहरादेवी मंदिराचे महंत जितेंद्र महाराज यांनी राजीनाम्याच्या मागणीला विरोध केला आहे. तसंच, संजय राठोड यांचा राजीनामा घेतला तर त्यांना आमदारकीचा राजीनामा देण्यास भाग पाडू, असा थेट इशाराही त्यांनी शिवसेनेला दिला आहे.
* बंजारा समाजाचा उद्रेक झाल्यास त्याला भाजपच जबाबदार
पूजा चव्हाण प्रकरणात मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतला आणि उद्या बंजारा समाजाचा उद्रेक झाल्यास त्याला भाजपच जबाबदार असेल असा इशारा महंत सुनील महाराज यांनी दिला आहे. यावेळी सुनील महाराज यांनी आम्ही एक ड्राफ्ट तयार केला आहे. या ड्राफ्टमध्ये राठोड यांचा राजीनामा न घेण्याची विनंती केली आहे. हा ड्राफ्ट ई-मेलद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.