सांगोला : पंढरपूर-कराड रोडवरील चिकमहूद पाटीजवळ झालेल्या तिहेरी अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दोघांवर उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
दोन मोटारसायकल व ट्रॅक्टर अशा तीन वाहनांचा अपघात झाला आहे. या अपघातातील मयत हे देवापूर (ता. म्हसवड) व पंढरपूर तालुक्यातील एकाचा समावेश आहे. अन्य दोन जखमी हे पंढरपूर तालुक्यातील आहेत.
दिघंची-महूद रोडवर महूद (ता. सांगोला) हद्दीत बंडगरवाडीनजीक ट्रॅक्टरने दोन दुचाकींना धडक दिल्याने दुचाकींवरील 3 जण जागीच ठार झाले, तर 2 जण गंभीर जखमी झाल्याची घटना काल शनिवारी सकाळी 11 च्या दरम्यान घडली. अपघातानंतर ट्रॅक्टरचालक ट्रॅक्टर न थांबवता भरधाव वेगाने निघून गेला. भगवान पडळकर (वय 70) व अक्षय पडळकर (20, रा. कासेगाव, ता. पंढरपूर), तसेच मुक्ताबाई कांबळे (75, रा. देवापूर, ता. माण, जि. सातारा) अशी मृतांची नावे आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दिघंचीकडून महूदच्या दिशेने भरधाव वेगाने ट्रॅक्टर जात असताना महूदकडून दिघंचीच्या दिशेने जाणार्या दुचाकीला जोराची धडक दिली. या दुचाकीवरील आजोबा व नातू जागीच ठार झाले. ट्रॅक्टरने भरधाव वेगाने पुढे जाऊन दुसर्या दुचाकीला मागून जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील मुक्ताबाई काबंळे जागीच ठार झाल्या, तर दोघे जखमी झाले.
मृत महिला व गंभीर जखमी झालेला व्यक्ती देवापूर (ता. माण, जि. सातारा) येथून महिम (ता. सांगोला) येथे कावीळवरील औषध घेण्यासाठी चालले होते, अशी माहिती प्राप्त झाली आहे. दुचाकीवरील ठार झालेले दोघे कासेगाव (ता. पंढरपूर) येथील असून भगवान पडळकर (वय 70) व अक्षय पडळकर (वय 20), अशी त्यांची नावे आहेत. हे दोघे आजोबा व नातू शनिवारी पौर्णिमेनिमित्त खरसुंडी येथे निघाले होते. खरसुंडीला पोहचण्याअगोदरच काळाने त्यांच्यावर घाला घातला आहे. जखमींची नावे समजू शकली नाहीत. या अपघातातील दुचाकींचा चक्काचूर झाला आहे. रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. या अपघाताचा अधिक तपास सांगोला पोलिस करत आहेत.