मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोनाची लस टोचून घेतली आहे. यासाठी शरद पवार मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात आले होते. शरद पवार यांच्यासोबत त्यांची कन्या सुप्रिया सुळेदेखील रुग्णालयात आल्या होत्या. दरम्यान, पवार हे कोरोना प्रतिबंधक लस घेणारे महाराष्ट्रातील पहिले राजकीय नेते ठरले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार यांनी मुंबईमधील जे. जे. रुग्णालयात कोरोनाची लस घेतली आहे. आज दुपारी तीनच्या सुमारास पवारांनी रुग्णालयामध्ये येऊन लस घेतली. आजपासून देशात करोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला असून त्याअंतर्गत ६० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मुंबईतील जे. जे. हॉस्पिटल येथे कोरोनाची लस घेतली. रुग्णालयाच्या कर्मचारी श्रद्धा मोरे यांनी त्यांना लस दिली. त्याआधी शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनीही कोरोनाची लस घेतली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आज सकाळीच सात वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही दिल्लीमध्ये करोनाच्या लसीचा पहिला डोस घेतला. मोदींप्रमाणेच शरद पवार यांनीही सोशल नेटवर्किंगवरुन या लसीकरणासंदर्भातील व्हिडीओ पोस्ट करत लसीकरणाची माहिती दिली.
“आज मुंबईतील जे.जे. रुग्णालयात कोरोनाची लस घेतली. आजपासून तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. ही लस घेण्यास पात्र असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी लवकरात लवकर लस घेऊन कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन करतो,” असं पवार यांनी लस घेतानाचा व्हिडीओ पोस्ट करत म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आज सकाळी सात वाजता दिल्लीमधील ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) रुग्णालयामध्ये लसीचा पहिला डोस घेतला. मोदींनीच लस घेतल्याचा फोटो पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली.