मुंबई : आघाडी सरकारने वीज बिलाच्या माध्यमातून सावकारीचा धंदा सुरू केला आहे. तीन एचपीच्या मोटरला सात ते दहा एचपीप्रमाणे बिल आकारले जात असून ही पठाणी वसुली बंद केल्याशिवाय विधिमंडळाचं कामकाज चालू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी सर्व भाजप पदाधिका-यांनी विधान भवनाच्या पायरीवर सरकारचा निषेध करुन घोषणा दिल्या.
विधानभवनाच्या दारातच आमदार राम सातपुते आक्रमक झाले. यावेळी राम सातपुते यांना आपल्या गळ्यामध्ये वीज मीटर, विजेचा पंप,स्टार्टर अडकवले होते. तसेच त्यांनी वाढीव वीजबिल फाडून शेतकऱ्यांच्या भावना सरकार दरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या मुंबई येथे सुरू असून यावेळी विधान भवनाच्या दारातच हे आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, राधाकृष्ण विखे – पाटील, नवनीत राणा – कौर यांच्यासमवेत भाजपचे नेते उपस्थित होते.
विधानसभेच्या आवारात वीजतोडणीच्या विरोधात आक्रमक आमदार राम सातपुते आणि विरोधी पक्षामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चर्चेची तयारी दाखवून वीजतोडणी तात्काळ थांबविण्याचे आदेश दिले. यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानून शेतकऱ्यांचे सरसकट वीजबिल माफ करण्याची मागणी केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अभाविपच्या संघटनतून संघर्ष करत आमदारकीपर्यंत पोहचलेले राम सातपुते हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतले म्हणून ओळखले जातात. आघाडी सरकारच्या विरोधात आतापर्यंत केलेल्या आंदोलनात जनतेची बाजू अतिशय आक्रमकपणे मांडत असल्याने राम सातपुते अल्पावधीत संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झाले आहेत.
याप्रसंगी भाजपचा सर्व नेत्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आघाडी सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. शेतकर्यांची वीज तोडणी थांबवून त्यांना सरसकट वीज माफी दिल्याशिवाय विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू देणार नसल्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले.
* उन्हाळ्याच्या तोंडावर वीज तोडणी – आमदार सातपुते
आंदोलनादरम्यान बोलताना राम सातपुते म्हणाले की, ‘सरकार बिल्डरांना करमाफी तसेच दारूच्या दुकानांना सवलती देत आहे. पण, शेतकऱ्यांना मात्र अव्वाच्या सव्वा सावकारकीसारखे वीजबील आकारून उन्हाळ्याच्या तोंडावर वीज तोडणी करत आहे. अगोदरच कोरोनामुळे शेतीमालाला भाव नसल्याने मेटाकुटीला आलेला शेतकरी वीज तोडणी केल्यास उध्वस्त होईल. शहरी भागात २४ तास वीज पुरविणाऱ्या या सरकारने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. शेतकऱ्यांकडे वीजबिल भरण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे त्यांना वेठीस धरू नका.’