मुंबई : ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ हा प्लॅटफॉर्म सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ‘तांडव’ या वेब सीरिजमुळे त्यांना माफी मागावी लागली होती. त्यातच आता अभिनेत्री साक्षी मलिकनं ॲमेझॉन प्राईम विरोधात तक्रार दाखल केली. तिला न विचारता चित्रपटामध्ये तिच्या फोटोंचा वापर सेक्स वर्कर म्हणून करण्यात आला. त्यामुळे तिने मानहानीचा दावा ठोकला. कोर्टानं त्वरीत ती दृश्य डिलिट करण्याचे आदेश दिले आहेत.
स्त्री ही काही वस्तू नाही की, समाजानं तिला कसंही वापरावं. दिवसेंदिवस समोर येणारे हे प्रकार फार भयंकर आहेत आणि ते कुठेतरी थांबायला हवेत. एखाद्या स्त्रीची प्रतिमा मलिन करणं म्हणजे छोटा गुन्हा नाही, असं मत व्यक्त करत हायकोर्टानं साक्षी मलिक प्रकरणात ‘व्ही’ या तेलगु सिनेमाच्या निर्मात्यांना सज्जड दम दिलाय. ॲमेझॉन प्राईम या ओटीटीवर विवादित सीन पूर्णपणे वगळल्याची हमी दिल्यानंतर तो पुन्हा: प्रदर्शित करण्यास हायकोर्टानं गुरुवारी परवानगी दिली असली तरी हे प्रकरण संपलं असं निर्मात्यांनी बिलकुल समजू नये असं न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी स्पष्ट केलं आहे.
दाक्षिणात्य सिनेमांत काम करणारी एक मॉडेल आणि अभिनेत्री साक्षी मलिकनं वेंकटेश्वर क्रिएशन या प्रॉडक्शन हाऊसविरोधात मुंबई उच्च न्यायालयात मानहानीचा दावा ठोकलाय. यात साक्षीनं आरोप केलाय की, ‘व्ही’ या तेलगु सिनेमात तिच्या परवानगीशिवाय तिचा एक खाजगी फोटो दाखवण्यात आला आहे. केवळ इतकच नव्हे तर एक वेश्या व्यवसाय करणारी महिला म्हणून हा फोटो वापरण्यात आला आहे. हा फोटो साक्षीनं साल 2017 मध्ये आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केल्याचं म्हटलं आहे. या प्रकारामुळे आपल्या प्रतिमेला मोठा धक्का बसला असून बराच मानसिक त्रास झाल्याचा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
एखाद्या महिलेचा खाजगी फोटो तिच्या परवानगीशिवाय चुकीच्या पद्धतीनं वापरणं हे कृत्य किती भयंकर असून त्याचे काय परिणाम होऊ शकतात याची कल्पना असायला हवी. ज्या कामासाठी तो फोटो वापरला, त्याजागी निर्मात्यांनी त्यांच्या घरातील महिलेचा फोटो का वापरला नाही?, असा सवालही गुरूवारी हायकोर्टानं उपस्थित केला. जर केवळ फोटो वापरायचाच होता तर एखाद्या परवानाधारक एजन्सीकडनं ते अधिकृतरित्या फोटो घेऊ शकत होते. मात्र महिलेच्या परवानगीशिवाय तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरनं तिचा खाजगी फोटा घेऊन तो आक्षेपार्ह सीनसाठी वापरणं हे काही छोटं प्रकरण नाही, हा एक गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे निर्मात्यांवर केवळ अब्रुनुकसानीचाच नव्हे तर कॉपीराईट कायद्याचं उल्लंघन केल्यासाठी स्वतंत्र खटला चालवला जाऊ शकतो, असंही हायकोर्ट पुढे म्हणालं.
* साक्षी मलिक यांनीही मांडली आपली बाजू
मुंबई उच्च न्यायालयात व्हीसीद्वारे याचिकाकर्ता साक्षी मलिक यांनीही आपली बाजू मांडली. ज्यात त्यांनी यासर्व प्रकारामुळे त्यांच्या खाजगी आयुष्यात किती नुकसान झालं आहे याची कोर्टाला माहिती दिली. त्यांच्या ठरलेल्या लग्नावर याचा थेट परिणाम झाल्याचंही त्यांनी कोर्टाला सांगितलं. यावेळी साक्षी मलिक यांचे वकील अलंकार किरपेकर यांनी कोर्टाला सांगितलं की, प्रदर्शित झाल्यापासून या सिनेमातून निर्मात्यांनी किमान 32 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे त्यांना एक मोठा दंड आकारून असे प्रकार करणाऱ्यांना जरब बसेल, असं उदाहण द्यावं अशी विनंती केली आहे. यावर सहमती दर्शवत हायकोर्टाने पुढील सुनावणीत निर्मात्यांना काळजीपूर्वक आपलं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देत सुनावणी 25 मार्चपर्यंत तहकूब केली.