वेळापूर : माळशिरस तालुक्यातील वेळापूर पोलीस ठाणे हद्दीतील दसूर येथील पोलीस पाटील अवैध वाळू धंदा करीत होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या पोलीस पाटलाला रंगेहाथ पकडून वेळापूर पोलिसांत गुन्हा दाखल केलाय.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पोलीस पाटील महेश अशोक शिंदे ( वय ३७, रा. दसुर) हा वाळूचा अवैध धंदा करीत होता. दरम्यान याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परीसरात कारवाई केली. यावेळी पोलीस पाटील शिंदेसह त्याचा साथीदार मयूर ऊर्फ सोन्या मारुती चेडे (रा. खळवे) यांच्यावर वेळापूर पोलिसांत गुन्हा दाखल झालाय.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या कारवाई मध्ये १२ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. यामध्ये २ लाख रुपयांची डम्पिंग ट्रॉली, १० लाखांचा महिंद्रा ट्रॅक्टर तर ७ हजार रुपयांची वाळू सोबत २५ हजार रुपयांची मोटारसायकल (MH45B9719) असा मुद्देमाल आहे.
ही कारवाई सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रवींद्र मांजरे, श पो उ नि खाजा मुजावर, पोहेकॉ नारायण गोरेकर, मोहन मनसावले, धनंजय गाडे, पोलीस अंमलदार धनराज गायकवाड, अक्षय दळवी, चालक समीर शेख यांच्या पथकाने केली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे करीत आहेत.