पुणे / विजापूर : कळंब येथील महाराणा कबड्डी संघातील खेळाडूंच्या तवेरा गाडीला विजापूर येथे आज बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास अपघात झाला. तवेरा आणि ट्रकच्या भीषण अपघातात दोन खेळाडूंचा मृत्यू झाला असून सोहेल सय्यद (२२ वर्षे), महादेव आवटे (२० वर्षे) अशी त्यांची नावं आहेत. गंभीर खेळाडूंना विजापूर येथील बंजारा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, हे खेळाडू हुबळी येथील स्पर्धेसाठी निघाले होते.
क्रीडाक्षेत्राला धक्का देणारी घटना आज बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे. पुणे जिल्ह्यातील कबड्डीपटू प्रवास करत असलेल्या तवेरा गाडीचा आणि कंटेनरची धडक होऊन मोठा अपघात झाला आहे. या अपघातात २ कबड्डीपटूंना आपला जीव गमवावा लागला आहे तर २ खेळाडू गंभीर जखमी झाले आहेत, असे वृत्त समोर येत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बुधवारी पहाटे कळंब येथील कबड्डीपटू कर्नाटकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या चौरंगी कबड्डी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जात होते. यावेळी हुबळीच्या दिशेने जात असताना विजापूरपासून ५० किलोमीटर अंतरावर पहाटेच्या सुमारात तवेरा आणि कंटेनरचा अपघात झाला. या अपघातात सोहेल सय्यद (वय २२ वर्षे) आणि महादेव आवटे (वय २०) या दोन युवा कबड्डीपटूंचा जागीच मृत्यू झाला आहे.
तसेच या अपघातात जखमी झालेल्या कबड्डीपटूंना विजापूरजवळीत बंजारा हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती कळताच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गंभीर दखल घेत जखमी खेळाडूंना तातडीने उपचार मिळावा, असे सांगितले आहे. हे खेळाडू महाराणा कबड्डी संघातील कबड्डीपटू होते. या अपघातानंतर पुणे जिल्ह्यातून तसेच कबड्डीविश्वातून हळहळ व्यक्त होत आहे.