मुंबई : पोलीस बॉम्ब ठेवतात ही देशाच्या इतिहासातील पहिली अशी धक्कादायक बाब आहे. बॉम्ब ठेवणारा सचिन वाझे हा उद्धव ठाकरेंच्या अत्यंत जवळचा व्यक्ती असल्याचे मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले. त्यामुळे प्रकरणाची चौकशी राज्य सरकारकडून योग्य पद्धतीने होणार नाही. केंद्र सरकारने कसून चौकशी करावी. कुणाच्या आदेशाशिवाय एखाद्या पोलिसाकडून अंबानींच्या घराबाहेर बॉम्ब ठेवण्याचे धाडस होणार नाही, असेही ते म्हणाले.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करत मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं. ज्यामुळं आता राज्याच्या राजकीय पटलावर बऱ्याच घडामोडींना वेग आला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याच धर्तीवर आता त्यांनी लिहिलेल्या पत्रानं सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. राजकीय वर्तुळातूनही आता यावर प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सदर प्रकरणी ट्विट करत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली. ही घटना पाहता महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमाच लागला आहे, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
‘मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ह्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र अत्यंत धक्कदायक आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे. गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा आणि ह्या प्रकरणात त्यांची उच्चस्तरीय चौकशी देखील व्हायला हवी’, असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं.
राज ठाकरे यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासमवेत या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचीही मागणी केली आहे. असं झाल्यास यामध्ये आणखीही काही नावं पुढे येण्याची बाब नाकारता येत नाही. तेव्हा आता या प्रकरणाला पुढे कोणतं वळण मिळतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.