बार्शी : कलर्स मराठी ऍवार्ड 2020 सोहळ्यात ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतील अभिमन्युच्या भुमिकेसाठी बार्शीच्या समीर परांजपेला लोकप्रिय नायकचा पुरस्कार मिळाला. त्याच्या या यशाबद्दल त्याच्यावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
रविवारी रात्री झालेल्या एका रंगतदार सोहळ्यात कलर्स मराठी ऍवार्डचे वितरण झाले. लोकप्रिय नायक पुरस्काराच्या स्पर्धेत समीर परांजपेबरोबर वाहिनीवरील इतर मालिकेतील दिग्गज व प्रथितयश कलाकार सुबोध भावे व भरत जाधव होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यांना मागे टाकून समीरने पुरस्कार जिंकला आहे. समीरच्या पुरस्कारासह ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेला लोकप्रिय मालिकेसह एकूण सात पुरस्कार मिळाले. त्यामुळे या सोहळ्यावर या मालिकेचीच छाप होती.
या पुरस्कारांनी मालिकेला रसिकमान्यता मिळाली, तसेच समीरच्या पुढील वाटचालीस या पुरस्काराने प्रेरणा दिली आहे, असे कौतुकोद्गार यावेळी रसिक प्रेक्षकांनी काढले. समीर हा येथील नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमधील मुख्य प्रशासकीय अधिकारी किशोर परांजपे आणि माजी नगरसेविका अरुणा परांजपे यांचा ज्येष्ठ पुत्र आहे.
“सुबोध भावे, भरत जाधव यांसारख्या अभिनेत्यांच्या बरोबरीने नामांकन मिळणे हाच खरतर माझ्यासाठी अवॉर्ड होता. सगळ्या रसिक प्रेक्षकांचे आभार. माझे आई- वडील, बायको, सगळी फॅमिली तसेच माझी शाळा आणि माझं गाव बार्शी जिथे मी लहानाचा मोठा झालो याचा माझ्या या वाटचालीत मोलाचा वाटा आहे.”
– समीर परांजपे