मुंबई : राज्यातल्या भाजप नेत्यांचे शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे. यावेळी राज्यातील कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न तसेच गेल्या काही दिवसांतील घटनांकडे राज्यपालांचे लक्ष वेधले. १०० कोटींचे वसुली प्रकरण व पोलिस बदल्यातील भ्रष्टाचार प्रकरणी भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. या संदर्भात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडून अहवाल मागवावा आणि तो राष्ट्रपतींना पाठवावा अशी मागणी करण्यात आली.
सचिन वाझे प्रकरण तसेच राज्यात सुरु असलेल्या बदल्यांच्या रॅकेट संदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. तसेच त्यांना या सर्व प्रकरणात लक्ष घालण्याचे निवेदन शिष्टमंडळाकडून देण्यात आले होते. त्यामुळे येणाऱ्या दिवसात आघाडी सरकारच्या अडचणी आणखी वाढणार असेच चित्र दिसून येत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या शिष्टमंडळात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार आशिष शेलार, मंगलप्रसाद लोढा, राधाकृष्ण विखे पाटील आदी नेत्यांचा सहभाग होता.
निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याला NIA ने ताब्यात घेतल्यानंतर अनेक धक्कदायक खुलासे समोर आले होते. त्यात वाझे आणि शिवसेना यांच्यातील संबंधांमुळे सेना एकाकी पडली होती. मात्र माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उचल बांगडी करण्यात आल्यानंतर त्यांनी थेट वाझे आणि देशमुख यांच्यातील १०० कोटी हप्ता वसूलीचे प्रकरण समोर आणले होते त्यामुळे सेनाबरोंबर राष्ट्रवादी सुद्धा गोत्यात आली होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १० मार्चला अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर या विषयावर कोणतंही मत जाहीरपणे व्यक्त केले नाही. शिवसेनेच्या इतर नेत्यांनीही सध्यातरी वाझे प्रकरणावर मौन बाळगले आहे.