नागपूर/ मुंबई : RFO दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात दोन अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात आली आहे. दीपाली या अमरावतीच्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पात कार्यरत होत्या. दीपाली चव्हाण यांनी सुसाईड नोटमध्ये उल्लेख केलेल्या DFO विनोद शिवकुमार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तर अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांची फिल्ड डायरेक्टर पदावरुन उचलबांगडी करण्यात आली.
मेळघाटातील डिजिटल व्हिलेज हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण ( वय ३२) यांनी काल गुरुवारी सायंकाळी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघड झाली. हरिसाल येथील शासकीय निवासस्थानी चव्हाण यांनी आत्महत्या केली, त्या घटनास्थळी सुसाईड नोट आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
धारणी येथून २५ किमी अंतरावरील हरिसाल येथे दीपाली चव्हाण या गुगामल वन्यजीव विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. वरिष्ठ वनअधिकाऱ्यांच्या मानसिक त्रासामुळे दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केल्याची चर्चा होत आहे. याचपार्श्वभूमीवर उप वन संरक्षक विनोद शिवकुमारला नागपूर रेल्वे स्थानकावर अटक करण्यात आली आहे.
क्षेत्रीय वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याला नागपूर रेल्वेस्थानकावर अटक करण्यात आली. विनोद शिवकुमार बंगळूरला जात असल्याची माहिती अमरावती पोलिसांना मिळाली. त्यांनी ही माहिती नागपूर लोहमार्ग पोलिसांना दिली. अमरावती पोलीस ही सकाळी नऊ वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर पोहोचले. अमरावतीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाल उपाध्याय, त्यांची चमू आणि लोहमार्ग पोलीस योगेश घुरडे, पप्पू मिश्रा, प्रवीण खवसे यांनी मिळून विनोद शिवकुमारचा शोध सुरू केला. तो रेल्वे गाडी ०२२९६ दिल्ली बंगळूर एक्सप्रेस मध्ये बसण्याच्या तयारीत असताना ९.३० वाजता त्यास अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर अमरावती पोलीस त्यास अमरावतीला घेऊन गेले.
दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर त्यांची चार पानी सुसाईड नोट सापडली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर मुख्य प्रधान सरंक्षक रेड्डी यांच्या नावे ही सुसाईड नोट लिहिण्यात आली आहे. यात वरिष्ठ अधिकारी DFO विनोद शिवकुमार यांनी मानसिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
* पती – पत्नीचा अखेरचा संवाद
काल गुरुवारी सायंकाळी त्यांनी अनेक नातेवाइकांशी फोनद्वारे संवाद साधला. त्यानंतर चिखलदरा येथील कोषागार कार्यालयात कार्यरत पती राजेश मोहिते यांच्याशी संपर्क साधला. तुम्ही लवकर या, खिचडी करते, असा संवाद त्यांच्यात झाला. लगेचच, तुला शेवटचे पाहायचे आहे, असे म्हणून त्यांनी पतीला लवकर येण्यास सांगितले. त्यामुळे मोहिते हादरुन गेले.