सोलापूर : अमित शहा आणि शरद पवार यांच्या अहमदाबादमधील कथित भेटीवर पंढरपुरात भाजप नेते, माजी मंत्री राम शिंदे यांनी खळबळजनक वक्तव्य केले. आज मंगळवारी त्यांना यावर प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. त्यावर राम शिंदे यांनी, ‘आगे आगे देखो होता है क्या’, अशी कोड्यात पाडणारी प्रतिक्रिया दिली होती.
महाविकासआघाडीचा प्रमुख आधारस्तंभ असलेले शरद पवार आणि भाजप नेते अमित शहा यांच्या गुप्त भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात तर्कवितर्क लावले जात आहे. त्यात आता भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांच्या नव्या वक्तव्याने अजूनच संभ्रम वाढवला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राम शिंदे यांनी त्याचबरोबर पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीवरही भाष्य केलं आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पंढरपूरची पोटनिवडणूक म्हणजे ठाकरे सरकारसाठी लिटमस टेस्ट असेल, असंही वक्तव्य राम शिंदे यांनी यावेळी केलं.
* भेट राजकीय कारणासाठी होती
या कथित भेटीत भाजप आणि राष्ट्रवादीचं काही ठरलंच तर गेल्यावेळसारखं शपथविधी झाल्यावर कळेल, अशी खोचक टिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तर, अलीकडच्या काळात महाराष्ट्रात महाविकासआघाडीचे सरकार आल्यापासून अशा भेटीगाठी कमी झाल्या होत्या. अमित शहा आणि शरद पवार यांची भेट राजकीय कारणासाठी होती, असंही वक्तव्य करता येत नाही. त्यामागे एखादं समाजपयोगी कारणही असू शकतं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये अशी भेट झालीच नाही, हे सांगण्याची स्पर्धा लागली आहे. यामुळे उलट शरद पवार आणि अमित शहा यांची भेट झाली हीच गोष्ट शिक्कामोर्तब होत आहे, असंही ते म्हणाले.