आम्ही पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या गावी पळसावडे(ता माण)कडे निघालो. या रोडवर पावसाची रिमझिम सुरू होती. गार वार सुटलेलं. पळसावडे गावाच्या बाहेर रानात महादेव जानकर यांचं घर आहे. मी चार वर्षांपूर्वी उन्हाळी मोसमात या घराकडे गेलो होतो. तेव्हा उन्हाच्या झळा होत्या, आज गारवा होता. दारात गेलो. पीपर्णीच्या झाडाजवळ दोन चौकटीच घर. घरावर पत्रे. आम्ही आत गेलो. आमच्यासोबत जानकर यांचे पुतणे स्वरूप बापू होते. त्यांचे वडील दादा दारात उभे होते. दुसरे चुलते सतीश आत बसलेले. खाली टाकलेल्या अंथरुणावर पांघरून घेऊन जानकर यांच्या वयोवृध्द आई कलंडलेल्या.
‘आई आताच झोपलीय. ‘सतीश यांनी सांगितलं. घरात कोणीतरी आल्याची चाहूल त्या म्हातारीला लागली. त्या थोड्या हलल्या. त्या जाग्या झाल्याचं समजताच स्वरूप बापुनी हाक दिली. ‘आये..”
मग त्या उठल्या.
स्वरूपनी विचारलं, ‘कोण हाय मी?’
त्यानी त्यांच्या तोंडावरून हात फिरवत, त्यांचा अलमला घेत सांगितलं, ‘बापू हाय. ‘आजीनं नातवाला ओळखलं.
मी गोष्ट सांगतोय राज्यात सध्या मंत्री असलेल्या महादेव जानकर यांची. त्यांच्या आई आमच्या समोर होत्या. राज्याच्या मंत्रीमहोदयांची आई एका साध्या घरात होत्या. आजकालच्या जमान्यात न पटणारी ही गोष्ट. मेंढ्यांच्या मागे भटकणारे जानकर साहेबांचे आईवडील. मूल लहान असताना गावोगावी हे कुटुंब फिरलेले. मेंढ्या जगवण्यासाठी जो संघर्ष करावा लागतो, जी भटकंती करावी लागते ती या कुटूंबाने केलेली. जानकर साहेबही लहान असताना मेंढ्यांच्या मागे फिरले. पण त्यांच्या आईवडिलांनी प्रतिकूल परिस्थितीतही मुलांना शिक्षण दिले. जानकर यांनी स्वतः अभियांत्रिकी पदवी घेतली. त्यांच्या भावांनी सतीश यांनी कायद्याची पदवी घेतली. हे दोन भाऊ नोकऱ्या करतील, घरचं दारिद्र्य जाईल अशी मोठ्या भावाची अपेक्षा होती. पण या भावांनी नोकऱ्या न करण्याचा निश्चय केला. घरचा संसार कोणीही करेल. त्यानी समाजाचा संसार करायचं ठरवलं. याच दरम्यान महादेव जानकर यांनी ‘जोवर पंतप्रधान होणार नाही तोवर लग्न करणार नाही. ‘अशी आगळीवेगळी प्रतिज्ञा केली. त्याचवेळी घरी कधीही न जाण्याचे जाहीर केले. त्यानंतर जानकर यांनी यशवंत सेना आणि नंतर राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून आपले राजकारण उभा केले.
एकाचवेळी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना या पक्षांना ते विरोध करू लागले. कसलीही आधुनिक साधने नसताना मिळेल ते वाहन घेऊन त्यानी गाव आणि वस्त्या जवळ केल्या. रात होईल तेथे मुक्काम केला. मिळेल ते खाल्लं. बरोबरीची पोरं गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या करत असताना जवळ अभियांत्रिकीची पदवी असताना हा माणूस धनगर समाजाला जागे करण्यासाठी फिरत राहिला. त्यांच्या त्यागाला का महत्व आहे, जवळ डिग्री असताना त्यानी त्या डिग्रीचा आधार घेत कोठेही चांगली नोकरी मिळवली असती. पण तसं केलं नाही. त्यागाच्या गप्पा मारणे आणि त्याग करणं या वेगळ्या गोष्टी आहेत. आणि या माणसाने त्यागाचे कधी भांडवल केलं नाही. मार्केटिंगचा काळ असताना स्वतःच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या साध्या राहणीमानाचे कधी मार्केटिंग केले नाही. त्यामुळे अगदी अलीकडच्या काळातील पोरांना हे माहिती नाही.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आम्ही ज्या आजीपुढं बसलो होतो त्याच आजीने हा मुलगा महाराष्ट्राला दिला होता. आपला पोरगा शिकून काहीच कस करत नाही. प्रपंचाला हातभार लावत नाही. घरीही येत नाही, अगदी तो कोठे असतो आणि काय करतो? असे प्रश्न कधीकाळी या आजीला पडले असतील. पण आज आपला पोरगा मोठा झाला आहे याचा आजीला आनंद आहे.
चांगलं झालं माझं. ‘अडकळत्या स्वरात त्या बोलतात. आपला पोरगा मंत्री झालाय म्हणजे किती मोठा झालाय हे नक्की तिला माहिती नसावं. पण पोरानं आपला पांग फेडलाय. आपण मेंढरं जगवयला आणि फाटक्या संसाराला टाके घालायला जी पायपीट केलीय त्याच सार्थक झालंय. हे तिला ज्ञात झालंय. त्यामुळे त्या पत्र्याच्या घरातही ती आनंदी आहे. त्या चंद्रमौळी झोपडीत एका कर्तबगार मुलाच्या आईच्या चेहऱ्यावरचा आनंद मला साक्षात बघता आला. आपल्या पोरानं स्वतःचा संसार केला नाही पण समाजाचा संसार केलाय, आपल्या पोरानं सख्या भावांना काही दिलं नसेल पण लाखो भावांच्या हाकेला धावला. हे सगळं समाधान आजीच्या चेहऱ्यावर होतं.
आपण अनेक राजकीय नेत्यांच्या साधेपणाच्या गोष्टी ऐकतो, सांगतो. केरळ आणि पश्चिम बंगाल मधील काही आमदारांच्या साधेपणाने आपण भारावून जातो. आपल्याकडेही गेल्या पंचवीस स्वतःच्या घरात पाऊल न ठेवलेला हा माणूस आहे. त्यांच्या राजकीय मतांशी कोणी सहमत असेल कोणी सहमत नसेल, पण एका मिनिस्टरच्या त्यागाची आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांच्या साधेपणाने जगण्याची डोळ्याला दिसणारी सत्यकथा आपण नाकारायची काय? हा एक कार्यकर्ता म्हणून मला पडलेला प्रश्न आहे.
बिनदुधाचा चहा आला. आम्ही पिलो.रात्र वाढत चाललेली. त्या जानकरांच्या वस्तीच्या आसपास वेगवेगळे आवाज येत होते. वाराही वाहत होता. वस्ती संपली की एक छोटी टेकडी लागते. त्यानंतर येत लिंगीवरे गाव. हे सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील शेवटच गाव. याच शिवारात महादेव जानकर यांचं बालपण गेलेलं.त्याच माळावर त्यानी गुर राखलेली. पण हा माणूस पुन्हा कधी स्वतःच्या घरात आलेला नाही. वडील वारले तेव्हा आला पण चुलत्याच्या घरात राहिला. घेतलेली शपथ एवढ्या कठोरपणे कोण पाळत असेल का? सकाळी जानकर यांचा वडुजला कार्यक्रम झालेला. माणदेशाचे सुपुत्र लेखक उत्तम बंडू तुपे यांचा नागरी सत्कार जानकर यांच्या हस्ते झालेला. तुपे यांची हलाखीची स्थिती पाहून ते गहिवरत म्हणाले, यापुढे तुपे यांची उपेक्षा होणार नाही.आता मी मंत्री आहे. मला पगार आहे.मी माझा एक महिन्याचा पगार अडीच लाख रुपये तुपे यांना देतोय.’या घोषणेनंतर हा माणूस कार्यक्रमाचा नायक ठरलेला.
याच नायकाच्या घरातून त्यांच्या आईचे आशीर्वाद घेऊन बाहेर पडलो. जिचा पोरगा मंत्री आहे आणि जी साधं आयुष्य जगते. जिने हा लोकनेता घडवला आहे. ती एवढंच म्हणत होती,’माझं लै चांगलं झालं, लै चांगलं झालं.’
एकाद्या चित्रपटात शोभावी अशी या जानकर कुटुंबाची ऐकून न पटणारी पण डोळ्याला दिसणारी कथा आपल्यालाही पटवून घ्यावी लागेल. अस चित्र कोठेही नसेल आणि नाही.पण सगळं आयुष्य संघर्षात जगलेल्या महादेव जगन्नाथ जानकर या माणसाला आणि त्यांच्या कुटुंबाला यात काही विशेष वाटत नाही. पण त्याना विशेष न वाटणारी ही गोष्ट आपण सांगितली पाहिजे.कारण लोकांना काहीच माहिती नसतं, आणि जे माहिती असायला हवं ते तर अजिबात माहिती नसतं.
– संपत मोरे
9422742925