नागपूर : काल शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेशी संवाद साधला. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी टीका केली. ते म्हणाले, राज्यात कोरोनाबाबत काय उपाययोजना करणार आहोत. राज्यात अनेक ठिकाणी बेड मिळत नाही. त्याचं कारण मुख्यमंत्र्यांनी सांगायला हवं होतं. पण मुख्यमंत्र्यांनी केवळ विरोधकांवर टीका करण्यात वेळ घालवला. कालचं भाषण काय होतं? कशासाठी होतं? तेच कळलं नाही, असा खोचक टोला फडणवीसांनी लगावला आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कालच्या संवादावर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी कालच्या भाषणात कोरोना वाढण्याची कारणं सांगितली नाही. उपाययोजनाही सांगितल्या नाहीत. मुख्यमंत्र्यांचं कालचं भाषण कशासाठी होतं? तेच कळलं नाही, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही टीका केली. राज्यात कोविड वाढत आहे. त्यामुळे पुणे, नागपूर सारख्या ठिकाणी काय उपाययोजना करणार आहोत हे मुख्यमंत्र्यांनी सांगायला हवं होतं. राज्यात अनेक ठिकाणी बेड मिळत नाही. ते का मिळत नाहीत, त्यावर काय करणार आहोत, हे सांगणं अपेक्षित होतं. पण मुख्यमंत्र्यांनी काल केवळ विरोधकांवर टोलेबाजी करण्यात आणि टीका करण्यात वेळ घालवला. कालचं भाषण काय होतं? कशासाठी होतं? हेच कळलं नाही. कारण त्यात ना कोरोना वाढण्याबाबत भाष्य करण्यात आलं, ना उपाययोजनांची माहिती देण्यात आली, अशी टीका फडणवीस यांनी केली.
लॉकडाऊनला आमचा विरोध नाही. अपवादात्मक स्थितीत लॉकडाऊन करावा लागतो. पण तो नियम होता कामा नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन करताना देशातील शेवटच्या घटकाचाही विचार केला होता. मुख्यमंत्र्यांनीही तेच करायला हवं. केवळ जगभरातील देशात कोरोना कसा वाढतो हे सांगून चालणार नाही, त्या देशांनी काय पॅकेज दिलेत हे सुद्धा पाह्यलं पाहिजे, असा चिमटाही त्यांनी काढला.