रुग्णांच्या नजरेत पत्रकार खलनायक, गिधाडे झालीत अशी एक पोस्ट फिरत आहे पण खरंच तसं आहे काय?
पत्रकार आपले काम करतात म्हणजे नकारात्मकता पसरवतात की ज्यांनी ती निर्माण करायची तेच कमी पडत आहेत?
एक पत्रकार मित्र दवाखान्यातून बाहेर आल्यानंतर ज्या भावनेत आहे ती मान्य करुया. त्यांच्या लेखाचाही सन्मान करुया. पण पत्रकार हो, आपल्याच मनाला विचारा खरंच आपण गिधाडं बनलो आहोत काय? कोरोना कडे आपण आपत्ती म्हणून बघतो का संधी म्हणून? आपल्यापैकी कोणीही पत्रकार प्रामाणिकपणे याबाबतीत कधी लिहीत नव्हता का? गेले दीड वर्षे आपण आपले कर्तव्य पार पाडले आहे का नाही? आपण पंतप्रधानांनी केलेले टाळ्या थाल्या वाजवण्याचे आवाहन छापले तसे लोकांनी दिलेला प्रतिसाद आरोग्य सेवेचा केलेला गौरव छापला तसाच वाढती आकडेवारी, लॉक डाऊनचा आततायी निर्णय, लोकांचे हाल आणि त्याचे देशाच्या आणि जनतेच्या अर्थस्थितीवर झालेले परिणाम पण छापले.
आपल्याच सर्वांच्या टीकेचा हा परिणाम आहे की, पंतप्रधान यांनी यावर्षी सर्व मुख्यमंत्र्यांना लॉकडाऊन लावणे हा शेवटचा निर्णय असावा असे सांगितले. त्यांच्या निर्णयातील निरर्थकता आणि घोषणेमागचा पोकळपणा आपण वेळोवेळी दाखवून दिला. तसेच ज्या त्या राज्य सरकार, स्थानिक प्रशासनाच्या चुकाही त्यांच्या पदरात घातल्या. काही गंभीर वास्तवाला लोकांमध्ये भीती पसरू नये म्हणून ते न छापतही आपण अधिकारी, मंत्री यांच्याकडे तक्रारी करून परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले. डॉक्टर मंडळी वृत्तपत्र वाचू नका हे वाढत्या आकडे आणि त्यामुळे समाजात माजलेल्या गोंधळामुळे म्हणत होते. पत्रकार खैरनार ज्या काळात उपचारासाठी दाखल झाले असावेत त्याकाळात देशभर ओकसिजन तुटवड्यामुळे गोंधळ उडाला होता.
अपघात घडले, गॅस दुर्घटना घडल्या, दवाखान्यात विविध प्रकारचे स्फोट झाले आणि लोक दगावले. डोळ्यासमोर ज्यांचे प्रियजन दगावले त्यांचे वास्तव सांगायला नको? हे वर्तमान आपण छापले नसते तर उद्याच्या काळाने आपल्याला माफ केले नसतेच आणि वर्तमानाशी आपण निष्ठावान नव्हतो हेच म्हटले गीक असते. जे वृत्तपत्र वाचू नका म्हणत होते त्यांच्याच काही बांधवांनी अव्वाच्या सव्वा दर लावून लोकांना लुबाडले होते. त्याविरोधात वृत्तपत्रात बातम्या येत होत्या. येत आहेत. तक्रारी होत आहेत. सरकारी अधिकारी वसुली लावत आहेत. गुन्हे दखल होत आहेत. प्रामाणिकपणाने सेवा करणाऱ्या डॉकटर आणि दवाखान्याना त्रास होऊन त्याबद्दल दुःख आणि संताप वाटला तर ते योग्य होते. त्यांनी पत्रकारांना नावे जरी ठेवले तरी पत्रकारांनी ते मनावर घेण्याची गरज नव्हती. कारण त्यांच्या प्रमाणेच आपणही आपली जबाबदारी पार पाडत होतो. पण ज्या काही मूठभर मंडळींना फक्त पैसाच कमवायचा होता त्यांनी सेवेच्या बुरख्या खाली लूट चालवली होती आणि त्याविरुद्ध बोलणे हे पत्रकारांचे कर्तव्यच होते. हे देशातील कुठल्या जिल्ह्याची आय एम ए नाकारेल? की काही मंडळींनी या वाहत्या गंगेत हात धुऊन घेतले नाहीत? ते तरी अशा लोकांचे समर्थन कुठल्या तोंडाने करतील? अशा लोकांनी रुग्णांना पत्रकारांच्या विरोधात सांगणे किंवा बातम्या वाचू नका असे सांगणे का सुरू असेल हे आपण समजू शकतो.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोशल मीडियावर पसरवली जाणारी निगेटिव्हीटी आणि वृत्तपत्रांचे वार्तांकन यात जबाबदारीचाच खूप मोठा फरक आहे. पत्रकारांनीच नव्हे तर समाजानेही हे योग्य पद्धतीने समजून घेतले पाहिजे. कुठल्याच स्तत्ताधाऱ्याना आपल्या विरोधात कोणी लिहावे असे वाटत नाही. तसेच चुकीचे वागणाऱ्यानही कौतुकाचीच अपेक्षा असते. आपण पत्रकारांनी ती पूर्ण करावी का? सेवा समजून राबणाऱ्या कार्यकर्ते, संघटनांची दखल कुठल्या पत्राने घेतली नाही? पण सिलेक्टिव सकारात्मकता ज्यांना अपेक्षित असते त्यांना अशा राबणाऱ्या लोकांचे कौतुक म्हणजे अव्यवहारी लोकांचे कौतुक वाटते. मग अशा फक्त व्यवहारी चमकूंसाठी वृत्तपत्रांनी व्यवहारी कौतुक जाहिरात रुपात छापण्यास सुरुवात केली. त्यालाही प्रतिसाद लाभत होता.
अशा प्रकारे प्रसिध्दी मिळवणारे वेगळे आणि प्रत्यक्ष राबणारे वेगळे यांच्यात वृत्तपत्रांनी फरक केलेलाच आहे आणि जनतेला समजेल इतका सुस्पष्ट केला आहे. लपवलेले नाही. पण, वृत्तपत्रांना त्यासाठी शत्रू किंवा गिधाडे भासविणारे आपल्याकडील लक्ष दुसऱ्याकडे वळवण्यासाठी हे करतच असतात. “तुमचे वृत्तपत्र हे सत्य सांगणार नाही” अशा छापाच्या सोशल मीडिया वरील पुढल्या सोडू संदेश जे लोक पैसे घेऊन कोणासाठी तरी फिरवत होते तेच आज पुन्हा वृत्तपत्रांबद्दल अशी दिशाभूल करणारी चर्चा घडवत आहेत.
दुर्देवाने एक पत्रकार पण अशा प्रपोगण्ड्याला बळी पडला. मोबाईलवरील बातमी वाचून त्यांचा ओक्सिजन कमी झाला आणि त्यांनी दोष समस्त पत्रकारितेला दिला हे वाईटच. असो. सकारात्मक बातम्या कमी झाल्या कारण समाजात नकारात्मक अधिक घडते आहे. जी सकारात्मक घडते त्याला वृत्तपत्रांच्या पानात खरेच स्थान मिळत नाही असे आहे का? पण त्या सकारात्मकतेचा लोकांवर फारसा फरक पडत नाही. याचाच अर्थ कुठेतरी ज्यांनी फरक पाडला पाहिजे त्या यंत्रणा सकारात्मकता निर्माण करण्यातच कमी पडत आहेत. किमान वृत्तपत्रांनी ही जाणीव करून दिलीच पाहिजे. तर काही अधिक चांगले आणि सकारात्मक घडेल. तुमचे मत वेगळे असू शकते, त्याचा सन्मान आहे. पण पत्रकार म्हणून माझेही काही म्हणणे आहे…..
– शिवराज काटकर, पत्रकार
9325403226