सोलापूरच्या सिनेमागृहांचा बहुतेक समावेश पश्चिमेला जास्ती आहे , दत्त चौक क्रॉस करून हैदराबाद किंवा अक्कलकोट रोड कडे थिएटर्स ची संख्या थोडी त्या मानाने कमी आहे . दत्त चौकात पूर्वीचं ” सेंट्रल ” आणि नवीन नामकरण झालेलं ” शालिमार ” टॉकीज . हे बहुतेक मॅटीनी स्पेशल थिएटर आहे , नवीन सिनेमा इथे कमी लागायचे , ब्लॅक अँड व्हाइट , राजेंद्रकुमार , दिलीपकुमार , प्रेमनाथ , राजकपूर , यांचे बरेच गाजलेले सिनेमे इथं लागायचे . एखाद्या पोरीला सिनेमाला घेऊन जाणे , बापरे ! त्या काळी मुलगा मुलगी सिनेमाला एकत्र दिसले म्हणजे अख्या गावात बोंब व्हायची . ” राजाला बघिटलो बे ! त्या xxxx च्या पोरीला न्हेलता बे कडू ! ”
अश्या बातम्या व्हॅट्सऍपी वेगाने पसरायच्या ( व्हाट्सऍपी वेग म्हणजे इतका असतो की , कित्येक हॉर्स पॉवर पेक्षा ही जास्त वेग असतो ) कालचं उदाहरण घ्या , चित्रमंदिर चा लेख मी शेअर केला आणि पाचव्या मिनिटाला , माझ्या एका मित्राने , मलाच माझा लेख “राजगुरू ” ह्या नावाने पाठवून चकित केलं . मी पाठपुरावा केला पण काही उपयोग झाला नाही . असो , तर त्या काळी तुमच्या बरोबर सिनेमाला मुलगी असली तर , ती बातमी वेगाने पसरायची . सेंट्रल ला पूर्वी देवानंदचा
” गाईड ” हा सिनेमा लागला आणि खूप दिवस चालला होता . माझ्या भावाच्या एका शहा नावाच्या मित्राने तो , जेव्हढे दिवस होता तेव्हढे दिवस रोज पहिला होता . हिंदी सिनेमाच्या फॅन्स चे सोलापुरी किस्से खूप भारी आहेत , हळूहळू ते पण ऐकविन . दत्त चौक क्रॉस करून समाचार चौकातून वर जाताना
” पद्मा चित्रमंदिर ” हे अतिशय गाजलेले थिएटर आहे . तिथे अर्थात प्रेक्षक वर्ग कानडी आणि तेलगू जास्त असल्यामुळे , जास्त कानडी आणि तेलगू सिनेमे लागायचे . अर्थात आम्ही त्या पण सिनेमावर प्रेम केलंय , डॉक्टर राजकुमार , एन . टी. रामाराव अश्या त्या काळी गाजलेल्या हिरोंचे सिनेमे तिकडे जाऊन पाहिलेले आहेत , शास्त्रीय संगीतावरचा ” सनादि आप्पण्णा ” वगरे बघायला तिकडेच जावं लागायचं , ना निन्न मारियालारे , ना निन्न बिडलारे , असे अनेक गाजलेले सिनेमे तिथे पाहिलेत , आणि पद्मा ला गेलो की पद्मा रेस्टॉरंट मधली स्पेशल पुरीभाजी खाल्ली पाहिजेच असा रिवाजच होता .
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आता राहिलं ते सोलापूरच्या पूर्व विभागाची शान म्हणजे ” गेंट्याल ” हे कदाचित त्याच्या मालकाच्या आडनावावरून ठेवलेलं नाव असावं . पण पश्चिमेकडील प्रेमी युगुलांना आपल्या लैला , हिर , शिरीन , ज्युलियेट , अनारकली , यांना सिनेमा दाखवण्याचा , आणि ते पण कुणाला न कळता भेटण्यासाठी , बांधलेलं थिएटर असावं असा अंदाज आहे !
कधी कधी तर गाजलेला सिनेमा दोन ठिकाणी लावला जायचा , गेंट्याल ला तो एक तास उशिरा सुरू व्हायचा . गावातल्या थिएटर मधे पहिले दोन रीळ
फिरवून झाले की , ते रिक्षात घालून गेंट्यालला आणली जायची , मग इकडे सिनेमा सुरू व्हायचा . तिकडे चुकला तर इकडे तो नक्की बघायला मिळायचा !
एकंदरीत त्या काळी , टीव्ही नव्हता आणि अजून मोबाईल चा शोध लागायचा होता , म्हणून ही सगळी सिनेमा थिएटर्स भरलेली असायची , आता ते दिवस गेले , आता फक्त आठवणी उरल्यात . मुंबईचं प्लाझा काय , पुण्याचं अलका काय , सोलापूरचे उमा काय , फास्ट बदलाच्या ह्या दिवसात त्यांनी जुनेपण सोडलं नाही , नाविन्याची आस धरली नाही हा एक भाग आहेच , पण लोकांची आजची अभिरुची बदललीय , करमणुकीची अनेक साधनं निर्माण होताहेत . दिलीप कुमार , राजेश खन्ना , धर्मेंद्र , अमिताभ हे निदान तीन तास तरी अंगात साकारता येत होते . छान रोमँटिक हिरो सारखं आपण दिसतोय असं प्रेक्षकांना वाटायचं , थोडी हेअर स्टाईल केली की आपण हेमा , राखी , वहिदा , यांच्यासारख्या आरशात तरी दिसतो असं वाटायचं . आता नवीन पिढीला तसं वाटत नाही , कारण हातातला मोबाईल त्यांना दोन दोन मिनिटाला खऱ्या अस्तित्वाची जाणीव करून देत असतो !
– सतीश वैद्य
9373109646