पंढरपूर / सोलापूर : आषाढी एकादशीसाठी पंढरपूरच्या वेशीवर म्हणजे वाखरी येथीवा पालखी तळावर आलेल्या वारकऱ्यांनी पायीवारीवरुन आक्रमक भूमिका घेतली. यावर प्रशासनाने सावध पवित्रा घेत नमते घेत 30 वारकऱ्यांना पालखीसोबत पंढरपुरात पायी जाण्यास (पायीवारी) परवानगी दिली. अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या शिष्टाईस यश आले आहे. यावर तोडगा निघाला आहे. आता मानाच्या दहाही पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत.
यापूर्वी शासनाने वाखरी ते विसावा इथपर्यंत प्रत्येक पालखी सोबत 40 वारकरी आणि विसावा येथून पंढरपूर पर्यंत प्रत्येक पालखी सोबत 2 वारकऱ्यांना परवानगी दिली होती. मात्र वारकऱ्यांनी हा प्रस्ताव नाकारून जाऊ तर सर्व 40 नाही तर नाही अशी भूमिका जाहीर केली. या भूमिकेमुळे प्रशासन हवालदिल झाले. त्यानंतर अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी वारकऱ्यांसोबत चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र वारकरी ठाम होते.
शेवटी वाखरी ते इसबावी विसावा एसटी बसमधून आणि तिथून पंढरपूर पर्यंत 30 वारकरी प्रत्येक पालखी सोबत पायी जाण्याचा तोडगा प्रशासनाने मान्य केला आणि वारकऱ्यांनी समाधान व्यक्त करीत पालख्या पुढे जाण्याचा मार्ग मोकळा झाला. वाखरीपासून ईसबावीपर्यंत सर्व पालख्या बसने जाणार असून येथून पुढे पंढरपुर पर्यंत ३० वारकरी पालखीसोबत चालण्याची परवानगी देण्यात आली आहे.
कानड्या विठुरायाची आषाढी एकादशी उद्या मंगळवारी आहे. माञ कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे याञा सोहळ्यावर निर्बंध आले आहेत. सोमवारी दुपारी तीन वाजणेच्या सुमारास भाविकांविना संत ज्ञानेश्वर माऊली वाखरी पालखी तळावर विसावले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यात्रा सोहळ्यातील शेवटचा मुक्काम वाखरी पालखी तळावर संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज या प्रमुख संतासह अन्य संताच्या पालख्यांचा असतो. यामुळे प्रत्येकवर्षी लाखो भाविकांची गर्दी या पालखी तळावर असते. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पालखी विसावली.
यावेळी प्रशासनाच्या वतीने संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे स्वागत केले.
आषाढी यात्रेनिमित्त मानाच्या दहा पालख्या एसटीच्या शिवशाहीने श्री क्षेत्र पंढरपूर येथे सुखरूप दाखल झाल्या. यंदा राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार मोजक्या वारकरी बांधवासह माऊलीच्या पवित्र पादुका घेऊन जाण्यासाठी एसटी महामंडळाने ” शिवशाही ” बस मोफत पुरवल्या होत्या.
आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची पालखी, देहू येथून संत तुकारामांची पालखी, सासवड वरून संत सोपान काकांची पालखी, त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथांची पालखी ,मुक्ताईनगर येथून संत मुक्ताबाईची पालखी, पैठण येथून संत एकनाथांची पालखी, पिंपळनेर- पारनेर येथून संत निळोबारायांची पालखी कौंडिण्यपुर(अमरावती) येथून रुक्मिणी माता यांची पालखी व पंढरपूर येथून संत नामदेव महाराज यांची पालखी अशा दहा मानाच्या पालख्या श्री क्षेत्र पंढरपूर येथे सुरक्षित पोहोचल्या.
या साठी एसटी महामंडळाने परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब यांनी दिलेल्या निर्देशानुसार काळजीपूर्वक नियोजन केले होते. प्रत्येक पालखीबरोबर तातडीचे दुरुस्ती पथक, पर्याप्त अधिकारी व कर्मचारी वृंद, अतिरिक्त चालक व बस देण्यात आले होते. विशेष म्हणजे एसटीने नव्याने सुरू केलेली वाहन शोध प्रणाली (GPS) सर्व शिवशाही बसेसना बसविण्यात आली होती. त्यामुळे विविध तीर्थक्षेत्रवरून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या बसेस कुठे पोचल्या आहेत याची माहिती घेणे सोपे झाले.
नंतर वाखरीपासून ईसबावी विसावापर्यंत शासनाने पायी चालत जाण्यास परवानगी दिली होती. मात्र विसावापासून पंढरपूरपर्यंत एका पालखीसोबत दोनच व्यक्तींनी चालत जाण्यास परवानगी दिली होती. मात्र पंढरपूरपर्यंत सर्वच वारकरी लोकांना पायी चालत जाणेस परवानगी देण्यात यावी अन्यथा वाखरी मधून पालखी जाणार नाही असा पवित्रा घेतला होता.
* वारी बंदोबस्तातील पाच पोलिसांसह होमगार्डला कोरोनाची लागण
कोरोनामुळे मोजक्याच वारक-यांना आणि मानाच्या दहा पालख्यांना पंढरपुरात येण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोरोनामुळे पंढरपूरला तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. काल रविवारी कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीत पाच पोलिसांसह एका होमगार्डचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. खबरदारीचा प्रथम उपाय म्हणून या बाधितांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
कोरोना वाढू नये म्हणून प्रशासनाने कडक निर्बंध लावून दिले आहे. यामुळे मोजक्याच नागरिकांना व दिंड्यांना पंढरपुरात प्रवेश देण्यात येत आहे. परवानगीशिवाय कोणीही पंढरपुरात येऊ नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. जवळपास तीन हजार पोलिसांना येथे तैनात करण्यात आले आहे. दोन दिवसांत तीन हजार पोलिसांची कोरोना चाचणी करण्यात आली. रविवारी आलेल्या अहवालात पाच पोलिसांसह एका होमगार्डचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
सोलापूरआषाढी वारीसाठी बंदोबस्ताला आलेल्या सर्व पोलिसांच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. दोन दिवस चाललेल्या चाचण्यांमध्ये पाच पोलिसांसह एका होमगार्डचा अहवाल पॉझिटिव्ह आला. पॉझिटिव्ह आलेल्या पोलिसांना विलगीकरण कक्षात ठेवले असल्याचे अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले. पॉझिटिव्ह आलेल्या पोलिसांना तातडीने विलगीकरण कक्षात पाठवण्यात आले आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी ही तपासणी करण्यात येत असल्याचेही सांगितले.
* उद्या शासकीय महापूजा
उद्याच्या शासकीय महापूजेनंतर मंदिर समितीने केलेल्या विठुरायाच्या नवीन प्रतिमांचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते केले जाणार आहे. यानंतर संत कान्होपात्राचे झाड म्हणून ओळख असलेले तरटीचे झाड वयोमानाने वाळले आहे. त्या ठिकाणी नवे तरटीचे रोपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते केले जाणार आहे.
महापूजेसाठी मुख्यमंत्री व त्यांचे कुटुंबीय, मानाचे वारकरी दाम्पत्य, मंदिर समितीचे सहअध्यक्ष, पालकमंत्री यांनाच गाभाऱ्यात प्रवेश दिला जाणार आहे. सुरवातीला गाभाऱ्यात मंदिराचे पुजारी असतील. त्यावेळी मंदिरातील चारखांबीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , त्यांचे कुटुंबीय, मानाचे वारकरी, मंदिर समितीचे सहअध्यक्ष यांची उपस्थिती असेल. तर सोळखांबीत मंदिर समितीचे 14 सदस्य, सल्लागार समितीचे नऊ सदस्य, विभागीय आयुक्त, विशेष पोलिस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी व प्रांताधिकारी यांची उपस्थिती असणार आहे.