पंढरपूर / सोलापूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठू माऊलीच्या दर्शनाला, आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला माऊलींचा पालखीसोहळा मोजक्या वारक-यांसह फुलांनी सजवलेल्या शिवशाहीतून अगदी दिमाखात पंढरपूरच्या वाखरी तळावर दाखल झाल्या आहेत.
‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय” अशा जयघोषात तीर्थक्षेत्र आळंदीतून माऊलींच्या चांदीच्या चलपादुका घेऊन आज सोमवारी सकाळी आजोळघरातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले होते. दुपारी पंढरपुरात दाखल झाले. आषाढी एकादशीला परंपरेने चाललेल्या राज्यभरातील विविध तीर्थक्षेत्रांवरून मानाच्या पालख्या या थेट पंढरपूरमध्ये आणण्यासाठी राज्य शासनाने एसटी महामंडळावर जबाबदारी टाकली होती.
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोमवारी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास वाखरीत दाखल झाली. यावेळी विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने स्वागत केले. यावेळी मंदिर समितीचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित आहेत. मानाच्या पालख्या विशेष वाहनाद्वारे वाखरी येथे पोहोचल्या. नंतर पंढरपूरकडे १.५ किमीचे अंतर प्रातिनिधिक स्वरूपात पायीवारी काढण्यात आली.
कानड्या विठुरायाची आषाढी एकादशी उद्या मंगळवारी आहे. माञ कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे याञा सोहळ्यावर निर्बंध आले आहेत. सोमवारी दुपारी तीन वाजणेच्या सुमारास भाविकांविना संत ज्ञानेश्वर माऊली वाखरी पालखी तळावर विसावले.
यात्रा सोहळ्यातील शेवटचा मुक्काम वाखरी पालखी तळावर संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज या प्रमुख संतासह अन्य संताच्या पालख्यांचा असतो. यामुळे प्रत्येकवर्षी लाखो भाविकांची गर्दी या पालखी तळावर असते. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पालखी विसावली.
यावेळी प्रशासनाच्या वतीने संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे स्वागत केले.
यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, सह अध्यक्ष गहिनाथ महाराज औसेकर, सदस्य संभाजी शिंदे, माधवी निगडे आदी उपस्थित होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
माऊलींच्या पालखी मार्गेतील वाटेमध्ये अनेक ठिकाणी सर्वसामान्य जनतेने या पालखीचे दर्शन घेत फुले वाहिली. “दरवर्षी आषाढी एकादशीला लाखो वारक-यांची सेवा करणाऱ्यांचे दायीत्व एसटीने अगदी जबाबदारीने पार पाडले आहे. यंदा माऊलीच्या मानाच्या पालख्या नेण्याचे भाग्य एसटीला मिळाले, हा एसटीचा बहुमान समजला पाहिजे,” असे गौरवोद्गार परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी काढले आहेत.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पांडुरंगाची वारक-यांना आस लागली आहे. मात्र भाविकांना यंदाही आषाढी सोहळ्याला मुकावे लागणार आहे. प्रथेनुसार विठ्ठल – रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. गेल्यावर्षीसारखे यंदाही वारक-यांचा विठुरायाशी दुरावाच राहणार आहे. हा दुरावा, विरह वारक-या असह्य होत आहे. प्रतिवर्षी टाळ-मृदगांसह जयघोषाने दुमदुमणारी पंढरी वारक-यांविना सामसूम दिसत आहे.
महापूजेनंतर मंदिर समितीने केलेल्या विठुरायाच्या नवीन प्रतिमांचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते केले जाणार आहे. यानंतर संत कान्होपात्राचे झाड म्हणून ओळख असलेले तरटीचे झाड वयोमानाने वाळले आहे. त्या ठिकाणी नवे तरटीचे रोपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते केले जाणार आहे.
महापूजेसाठी मुख्यमंत्री व त्यांचे कुटुंबीय, मानाचे वारकरी दाम्पत्य, मंदिर समितीचे सहअध्यक्ष, पालकमंत्री यांनाच गाभाऱ्यात प्रवेश दिला जाणार आहे. सुरवातीला गाभाऱ्यात मंदिराचे पुजारी असतील. त्यावेळी मंदिरातील चारखांबीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , त्यांचे कुटुंबीय, मानाचे वारकरी, मंदिर समितीचे सहअध्यक्ष यांची उपस्थिती असेल. तर सोळखांबीत मंदिर समितीचे 14 सदस्य, सल्लागार समितीचे नऊ सदस्य, विभागीय आयुक्त, विशेष पोलिस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी व प्रांताधिकारी यांची उपस्थिती असणार आहे.