अक्कलकोट : देश – विदेशात अन्नदान सेवेत अग्रगण्य असलेल्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), अक्कलकोट या न्यासाचा यंदाचा ३४ वा वर्धापन दिन आणि श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त संपन्न होणारे धर्मसंकिर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम हे कोरोना राष्ट्रीय आपत्तीमुळे रद्द करण्यात आल्याची माहिती न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांनी दिली आहे.
कोरोनाच्या राष्ट्रीय आपत्तीमुळे गेल्यावर्षीही न्यासाचा वर्धापन दिन व श्री गुरुपौर्णिमा उत्सव आदी संपन्न होणारे १० दिवसाचे धर्मसंकिर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. यंदाही २०२१ या वर्षी कोरोनाचा प्रादूर्भाव कमी न झाल्याने जनजीवन ठप्प आहे. यास्तव यावर्षीचा ३४ वा वर्धापन दिन आणि श्री गुरुपौर्णिमा उत्सव काळातील १० दिवसांचे धर्मसंकिर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम पूर्णपणे रद्द केले आहे.
शुक्रवारी ( २३ जुलै) संपन्न होणारा ३४ वा वर्धापन दिन व गुरुपौर्णिमा उत्सव कसलाही डामडौल न करता कोरोना विषाणूचा संसर्ग व गर्दी टाळण्यासाठी साधेपणाने साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुपौर्णिमा दिवशी श्रींची नित्योपचार पूजा व महानैवेद्य अर्पण करण्यात येणार आहे. न्यासाच्यावतीने गेल्या २१ वर्षापासून धर्मसंकिर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदाचे २२ वे वर्ष आहे.
दरम्यान न्यासाचे स्वामी भक्तांसाठी अन्नदानाचे स्वामीकार्य कोरोना विषाणुच्या राष्ट्रीय आपत्तीमुळे गेल्या पाच महिन्यापासून थांबले आहे. या महामारीमुळे अन्नदान सेवा तात्पुरती स्थगित आहे. येथे सेवा करणारे ३०० सेवेकरी आहेत. जरी अन्नदानाचे कार्य थांबले असले तरी न्यासाच्या उद्देशाप्रमाणे, सामाजिक, आरोग्य विषयक, पर्यावरणपूरक, जलसंधारण, महिला सक्षमीकरण, वृक्षारोपण-संवर्धन, आपत्ती व्यवस्थापन मदतकार्य असे उपक्रम चालू आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या कोवीड-१९ ला हरविण्यासाठी वैद्यकीय उपचारासाठी वैद्यकीय साधन सामग्री, स्वच्छतेसाठी लागणारे साधनसामग्री आदींची मदत हे न्यास सातत्याने करीत आहे. नागरिकांना मास्क, सॅनिटाझरचे वाटप करण्यात येत आहे. अक्कलकोट येथील दोन कोविड सेंटर्स येथील रुग्णांना दररोज सलग ४ महिने अल्पोपहाराचे वाटप केले आहे. लॉकडाऊन कालावधीत सलग ५५ दिवस शहरामध्ये गरीब,निराधार व गरजूंना दैनंदिन जेवण वाटप करण्याचे अन्नदानाचे कार्य न्यासाने केले आहे. जवळपास ६० हजार गरजूंना लाभ झाला आहे.
तालुक्यात ज्यांना जेवन पोच करता येत नव्हते, अशा गरजूंना ग्रामीण भागात जाऊन १५ ते २० दिवस पुरेल इतके अन्नधान्य शिधा किटचे वाटप केले. १ हजार ७०० कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप केले आहे.
कोरोना विषाणू संदर्भात न्यासाच्या वतीने गेल्या वर्षी यात्रीनिवासमध्ये सहा महिने कोविड केअर सेंटर सुरु होते.
या वर्षी सुद्धा मार्च २०२१ पासून यात्रीनिवास येथे कोविड केअर सेंटर चालू आहे. न्यासाचे वतीने कोविड केअर सेंटर मधील रुग्णांना चहा, नाष्टा व जेवण पुरविण्यात आले. त्याचप्रमाणे शहर व खेडेगवात निर्जंतुकीकरणासाठी फवारणी करण्यात येत आहे. वैद्यकीय मदत व सेवा पुरविण्यात येत आहे.
२६ मार्च पासून अन्नदान सेवा, तात्पुरती स्थगित असून महाप्रसाद गृह, यात्रीभुवन, यात्रीनिवास, निवासी व्यवस्था पूर्णपणे बंद आहे. परगावच्या भाविकांनी सदर उत्सवास न येता आपल्या घरातच स्वामी पूजा आराधाना करावी, असे आवाहन मंडळाच्यावतीने न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांनी केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धर्मसंकिर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करुन श्री गुरुपौर्णिमा व वर्धापन दिनाचा कार्यक्रम साधेपणाने साजरे करणेबाबतचा अन्नछत्र मंडळाने निर्णय घेतला आहे, याची सर्व भाविकांनी कृपया नोंद घ्यावी, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांनी केले आहे.