सोलापूर : सोलापूरच्या कष्टाळू आणि प्रामाणिक समाज म्हणून ओळख असलेल्या पद्मशाली समाजाच्या कन्येचा विदेशात डंका वाजत आहे. कॅनडा देशातील कंपनीची मोठ्या पगाराच्या एक कोटी रुपयाची नोकरीची संधी मिळाली आहे. ही बाब पूर्वभागासाठी अभिमानास्पद ठरली आहे.
प्रीती व्यंकटेश कैरमकोंडा असे त्या युवतीचे नाव आहे. तिने विदेशात एमबीएचे शिक्षण घेतले आहे. कॅनडा या देशाच्या टोरॅंटो शहरातील ‘केपीएमजी’ या नामवंत कंपनीत नोकरीची संधी मिळाली आहे. तिला वार्षिक एक कोटी रुपये पगाराची ऑफर आहे. तेलंगणातून तेलुगु भाषिक पद्मशाली समाजाने सोलापुरात येऊन मराठी भाषेला आपलं केले आहे. शहरातील पूर्व भागात विविध उद्योग-व्यवसायात नावलौकिक मिळवला. सध्या पद्मशाली समाजातील अनेक युवक शासकीय नोकऱ्यांसह मोठ्या पदांवर कार्यरत आहेत.
येत्या सप्टेंबरपासून ती या कंपनीत रुजू होणार आहे. ती फार कष्टाळू व अभ्यासू असून तिच्यात उत्कृष्ट संभाषणकला व व्यावसायिक दृष्टिकोन असल्याचे तिचे वडील अभिमानाने सांगतात.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तिला अरेबिक, फ्रेंच, जर्मनी, मराठी, तेलुगु, हिंदी, इंग्लिश भाषा अवगत असून कॅनेडियन व अमेरिकेची बोलीभाषा उत्तम येते.
प्रीतीचे वडील मुलीविषयी बोलताना म्हणतात, माझी मुलगी प्रीती हिने मोठ्या कष्टाने विदेशात एमबीए केले. ती सप्टेंबरपासून टोरॅंटोमधील केपीएमजी या नामवंत कंपनीत नोकरी करणार आहे. पुढे सीईओ व्हायचे तिचे स्वप्न असल्याचे व्यंकटेश कैरमकोंडा यांनी सांगितले.
प्रीतीचे वडील व्यंकटेश कैरमकोंडा हे मूळ सोलापूर आहेत. ते विद्युत अभियंता आहेत. टाटा कन्सल्टिंगमध्ये नोकरी करत असताना त्यांना जपान, अबुधाबी येथे कामाची संधी मिळाली. नंतर त्यांनी रिसर्च करीत एका इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा शोध लावला. आशिया खंडात हे उत्पादन कोणीच बनवत नसल्याने त्यांनी भारतात परतून सोलापुरात फॅक्टरी टाकण्याचा संकल्प केला. याकरिता ते सहकुटुंब भारतात परतले. दरम्यान, कन्सल्टन्सी सर्व्हिसेसची ऑफर मोठ्या प्रमाणात आल्याने ते सध्या याच कामासाठी मुंबईत स्थायिक आहेत.
* प्रीतीविषयी अधिक माहिती
प्रीती हिचा जन्म सोलापुरात झाला. वडिलांच्या नोकरीदरम्यान ती अबुधाबीत चौथीपर्यंत शिकली. नंतर बदलीनंतर टोरॅंटो येथे गेले. प्रीतीचे पुढील शालेय शिक्षण टोरॅंटोत झाले. वडिलांनी नोकरी सोडून मायदेशात परतल्यानंतर तिने मुंबई विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्सची पदवी घेतली. त्यानंतर मुंबईत झायकस या विदेशी कंपनीत नोकरी करत असताना तिला अमेरिका, ब्राझील, मेक्सिकोमध्ये कंपनीतर्फे कामाची संधी मिळाली.
प्रीतीने टोरॅंटोच्या रोटमॅन बिझनेस स्कूलमध्ये 2019 मध्ये एमबीएसाठी प्रवेश घेतला. नुकतेच तिचे शिक्षण पूर्ण झाले. तिला एका वर्षापूर्वीच कॅनडा देशातील टोरॅंटो शहरात ‘केपीएमजी’ या कंपनीत वार्षिक सुमारे एक कोटी रुपये (वार्षिक दीड लाख कॅनेडियन डॉलर) पगाराच्या नोकरीची ऑफर आली. ती तिने स्वीकारली आहे.