उमरगा : उमरगा बसस्थानकात दोन महिन्याचे स्त्री जातीचे बाळ आणि तीन वर्षाची मुलगी आज शनिवारी (दि. २४) सायंकाळी बेवारस अवस्थेत आढळले. आगार व्यवस्थापकाने दोन्ही मुलींना पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. दरम्यान अगदी कोवळ्या जीवाला एकांतात कोण सोडून गेले, याचा तपास पोलिस यंत्रणेकडून केला जात आहे.
महिला पोलिस कर्मचारी त्यांची देखरेख करीत असून सुरक्षिततेसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. याबाबतची माहिती अशी की, उमरगा बसस्थानकात आज शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास लातूरला जाणाऱ्या प्लॉटफॉर्मवर दोन महिन्याचे स्त्री जातीचे बाळ आणि एक तीन वर्षाच्या मुलीजवळ कुणीही दिसत नसल्याने बसस्थानक प्रशासनाने स्थानकात चौकशी केली. त्या बाळाशी संबंधित कुणीही नातेवाईक आढळून आले नाही.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
वाहतूक निरीक्षक अभिनंदन सरवदे यांनी याची पोलिस ठाण्याला कळवले. सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, बीट अंमलदार कामतकर यांनी बसस्थानकात जाऊन सीसीटिव्ही फुटेज पाहिले मात्र तेथे अस्पष्ट असल्याने महिला पोलिस कर्मचारी बबिता शिंदे, आम्रपाली पाटील यांनी त्या बाळाला पोलिस ठाण्यात आणले. तेथे त्या चिमूकल्या बाळाचे रडणे ऐकून पाणी, दुध पाजण्यात आले. तीन वर्षाची मुलगीही कांही बोलत नाही. त्यामुळे या दोन्ही मुलींना उपजिल्हा रुग्णालयात सुरक्षिततेसाठी नेण्यात आले आहे.
या दोन्ही मुलीसंदर्भात माहिती असणाऱ्या व्यक्तींनी पोलिस ठाण्याशी संपर्क ( ०२४७५२५२१००) साधण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक मुकुंद अघाव यांनी केले आहे.