सोलापूर : लक्ष्मी उद्योग समूहाचे संस्थापक , बीके एंटरप्रायझेस व प्रभात टॉकीजचे संचालक आण्णासाहेब कलगोंडा पाटील यांचे काल शनिवारी (ता. 24 ) रात्री वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 82 वर्षे होते. दहा बारा दिवसांपूर्वीच त्यांना अश्विनी सहकारी रुग्णालयात दाखल केले होते. काल रात्री 8.45 वाजता त्यांची प्राणज्योत मावळली.
त्यांच्या मृत्यूपश्चात मुलगा मनोज, सुन माधुरी, तीन विवाहित मुली, तीन भाऊ,दोन बहिणी, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचे पार्थिव उद्या सोमवारी (ता. 26) सकाळी 10.30 ते 11.30 या वेळेत त्यांच्या होटगी रोड येथील निवास्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
आण्णासाहेब कलगोंडा पाटील यांनी उभारलेल्या लक्ष्मी उद्योग समूहाचे आण्णासाहेब पाटील यांनी कै जयकुमार पाटील यांच्याबरोबर एका वटवृक्षात रूपांतर केले. आज सोलापूर व कोल्हापूर येथे लक्ष्मी उद्योग समूह विस्तारलेला आहे. सोलापुरात लक्ष्मी हायड्रोलिक्स प्रा लि, लक्ष्मी ड्रकेन प्रा. लि., प्रभात टॉकीज, तसेच कोल्हापुरात लक्ष्मी पम्प्स प्रा. लि. व लक्ष्मी ऑइल इंजिन्स प्रा. लि. हे उद्योग सुरू आहेत. या सर्वांमागे अण्णासाहेब पाटील व जयकुमार पाटील यांनी सुरवातीला रोवलेले बीज कारणीभूत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आण्णासाहेब पाटील यांचे चौथी पर्यंतचे शिक्षण सोलापुरातील हंचाटे स्कुल तर पाचवी ते अकरावी पर्यंतचे शिक्षण नॉर्थकोर्ट टेक्निकल हायस्कूल मध्ये झाले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पत्नी म्हणजे अण्णासाहेबांच्या आत्या. घरात सगळ्यात मोठे असल्याने शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी व्यवसाय चालू केला. आण्णासाहेबांचा स्वभाव अत्यंत मितभाषी , सर्वांना जोडून घेण्याचा होता.
ग्राहकांशी सौजन्याने वागणे, त्याच्या अडचणी दूर करणे, प्रसंगी त्यांच्या शेतात जाऊन त्याची अडचण सोडवणे या बाबत ते आग्रही असायचे. ते कायम स्वरूपी सतत कार्यमग्न असायचे. गेल्या दिड वर्षात कोविड मुळे ते बाहेर पडू शकले नाहीत. शिवाजी चौक व्यापारी संघटना स्थापन करण्यात त्यांचा महत्वाचा सहभाग होता.
क्रिकेट हा त्यांचा आवडीचा विषय होता. आण्णासाहेब पाटील हे रयत शिक्षण संस्था, सोलापूरचे सल्लागार व मार्गदर्शक होते. त्यांना उद्योग व सेवा क्षेत्रातील निरनिराळ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.