सोलापूर : ऑनलाइन की अॉफलाईन असा वाद होत शेवटी सदस्यांची मागणी फेटाळून प्रशासनाने जि.प.सभा अॉनलाईनच घेण्याचा निर्णय घेतला. आज गुरुवारी दुपारी ऑनलाइन सभा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे होते. या सभेत आज पंढरपूर तालुक्यास स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा देण्याचा ठराव एकमताने मंजूर झाला आहे.
आजची सभेत सर्व नियोजनबद्ध झाल्याने एकाही सदस्यांनी यावेळी विरोध केला नाही. सांगोल्याचे जि.प. सदस्य सचिन देशमुख यांनी सुरुवातीलाच स्वतंत्र पंढरपूर जिल्हा करण्याचा ठराव मांडला. यामध्ये पंढरपूर, सांगोला माळशिरस, मंगळवेढा या चार तालुक्यांचा समावेश करण्याची मागणी त्यांनी केली. या ठरावाला ज्येष्ठ सदस्य वसंतराव देशमुख यांनी अनुमोदन दिले आणि हा ठराव एकमताने मंजूर झाल्याचं सचिन देशमुख यांनी सांगितलं.
सोलापूर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज गुरुवारी ऑनलाईन पद्धतीने झाली. यापूर्वी 2 ऑनलाईन सभा सदस्यांनी गोंधळ घातल्याने तहकूब झाल्या होत्या. त्यानंतर सर्व पदाधिकारी सदस्यांनी यावर तोडगा म्हणून सभेच्या एक दिवस अगोदर आढावा बैठक घ्यायची, त्यात विषयावर चर्चा करायची असे ठरले होते, त्याप्रमाणे बुधवारी दोन सत्रांमध्ये यशवंतराव चव्हाण सभागृहात आढावा बैठक झाली. त्याच दिवशी ऑफ रेकॉर्ड विषय मंजूर झाले?
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या सभेमध्ये गोंधळातच 26 विषयांना मंजुरी दिली गेल्याची माहिती आहे. सभाही ऑनलाइन होती. मात्र या सभेत बरीच टिंगल-टवाळी दिसून आली खाजगीमध्ये ज्या पद्धतीने चर्चा होतात. तशा चर्चा ऑनलाईन सभेमध्ये ऐकण्यास मिळाल्या. अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी एका महिला सभापती यांना बोलूच दिले नाही, त्या आमचा विषय प्रोसिडिंग मध्ये यावा म्हणून ओरडत होत्या, तुम्हाला काल बोलू दिले आज अजिबात बोलायचे नाही, म्हणून सरळसरळ दम भरला.
ज्यांनी बुधवारी बैठक घेण्यास भाग पाडले, ते ज्येष्ठ सदस्य वसंतराव देशमुख, भारत शिंदे, मदन दराडे, आनंद तानवडे, सभापती अनिल मोटे हे सलग बोलत होते. त्यांना मात्र बोलताना थांबवण्याची हिम्मत अध्यक्ष कांबळे यांच्यात दिसली नाही, हे अध्यक्ष पदाचे दुर्दैव होते. तानवडे आणि दराडे यांनी सभेला जॉईन झालेल्या अरुण तोडकर यांची सभेतच टर उडवली.
माळशिरसचे सदस्य त्रिभुवन धाईंजे हे या सभेला सुद्धा आक्रमक दिसून आले. त्यांनी महिला व बालकल्याण विभागातील त्या लोंढे कर्मचाऱ्यांचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला. त्यांच्यात आणि अध्यक्षामध्ये काही वेळ तू तू मै मै झाली, सभापती अनील मोटे हेसुद्धा या सभेत आक्रमक दिसले. त्यांनी विशेष करून अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे व जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील यांनी मात्र या ऑनलाईन सभेवर आपला बहिष्कार कायम ठेवत, ते या सभेला शेवटपर्यंत जॉईन झाले नाहीत.बुधवारी बैठकीला उपस्थित असलेले सुभाष माने सर यांनी आपली बरीच आणि अपेक्षित कामे बुधवारीच करून घेतली. प्रत्येक सभेत आक्रमक असणारे माने सर जिल्हा परिषदेमध्ये फिरकले सुद्धा नाहीत आणि ते ऑनलाईन सभेला सुद्धा जॉईन झाले नाहीत. आरोग्य विभागावर भ्रष्टाचाराचा मोठा आरोप करणारे भारतआबा शिंदे आजच्या बैठकीत मात्र जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शीतल जाधव यांच्यासोबत बैठकीला बसले, आरोग्य विभागावर काहीच बोलले नाहीत. हे विशेष.