सोलापूर : मुलगी झाल्याने पत्नीकडे घटस्फोटाची मागणी केली, परंतु पत्नीने घटस्फोट देण्यासाठी नकार दिल्याने तिचा अनन्वित छळ केला. पत्नीस कोरोना झाल्यानंतर तिचा मृत्यू होण्यासाठी कोरोनाचा शस्त्र म्हणून वापर करून तिला औषधोपचार योग्य वेळी न करून जाणीवपूर्वक तिचा मृत्यू घडवून आणल्याच्या आरोपावरून पतीविरूध्द सदोष मनुष्य वधाचा गुन्हा झाला होता. अटकेच्या भीतीने त्या पतीने अटकपूर्वसाठी कोर्टाकडे धाव घेतली. मात्र त्या पतीचा कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.
कर्नाटकच्या वैद्यकीय खात्यातील लिंगराज दामू पवार, (रा. तुकाई नगर, मंगळवेढा) याचा अटकपूर्व जामीन अर्ज पंढरपूरच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश कमल बोरा यांनी फेटाळला लावला. या मुलखावेगळ्या खटल्याची माहित अशी की, आरोपी लिंगराज दामू पवार याचा विवाह २००५ साली उमा शंकर चव्हाण, (रा. सोलापूर) यांची मुलगी अश्विनी हिच्याबरोबर झाला होता. लग्नानंतर अश्विनी हिस मुलगी झाली. मुलगी झाल्याने पती नाराज झाला व त्याची मजल पत्नीकडे घटस्फोटाची मागणी करण्यापर्यंत केली.
पत्नीने घटस्फोट देण्यास नकार दिल्याने पती लिंगराज याने पत्नीचा छळ सुरू केला. तो तिला सतत मारझोड करीत असे. एप्रिल २०२१ मधील पहिल्या आठवड्यात पत्नीस कोरोनाची लागण झाली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
परंतु पतीने मुद्दाम तिला उपचारासाठी नेले नाही. सासू-सासरे व शेजारच्या मंडळींनी उपचारासाठी नेण्यासाठी तगादा लावल्याने मंगळवेढा येथील डॉक्टरकडे नेले. त्या डॉक्टरांनी रूग्णाची प्रकृती गंभीर असल्याने सोलापूरला रूग्णालयात नेण्यास सांगितले. तरी या पतीने टाळाटाळ केली आणि खूप दिवसांनी विजापूरला उपचारासाठी नेले. जाताना वाटेत मुद्दाम भर उन्हात गाडी चार तास उभी करून विलंबाने विजापूरला नेले. तेथील डॉक्टरांनी बेळगाव येथील दवाखान्यात नेण्यास सांगितले तरी कोरोनाने पत्नी मरावी म्हणून अनेक दिवस उपचारासाठी बेळगावला नेले नाही.
पत्नी शेवटची घटका मोजत असताना खूपच पत्नीला उशिराने बेळगाव येथे नेले. तेथे तिचा मृत्यू झाला. अश्विनी हिची आई शिक्षिका उमा शंकर चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीचे आधारे आरोपीविरुद्ध भिरतीय दंड विधान कलम ३०४ (१), ४९८ ( अ) अन्वये मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
आरोपीने अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. सदर जामीन अर्जास प्रखर विरोध करणारे मूळ फिर्यादीचे वकीलपत्र दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे ॲड. सारंग वांगीकर, मूळ फिर्यादीतर्फे ॲड. धनंजय माने, ॲड. जयदीप माने, ॲड. सिध्देश्वर खंडागळे तर आरोपीतर्फे ॲड. मुल्ला यांनी काम पाहिले. अशा प्रकारचा खटला दाखल होण्याची ही पहिलीच घटना मानली जाते.