पुणे : पुण्याची एक महिला डीएसपी अडचणीत सापडली आहे. त्यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामध्ये त्या मटण बिर्याणी, प्रॉन्स आणि अजून एका नॉन व्हेज भाजीची ऑर्डर द्यायला आपल्या कर्मचाऱ्याला सांगत आहेत. तसेच पोलिसांनी आपल्या हद्दीतील हॉटेलमध्ये पैसे का द्यायचे? असा सवालही कर्मचाऱ्याला केला आहे. दरम्यान, ही ऑडिओ क्लिप ऐकल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
माध्यमांशी बोलताना गृहमंत्र्यांनी ती क्लिप पाहिल्याचे सांगत चौकशीचे आदेश दिल्याचे सांगितले. एका महिला पोलिस अधिकाऱ्याला पुण्यातील प्रसिद्ध हाँटेलची बिर्याणी मोफत हवी आहे. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्याशी केलेले फोनवरील संभाषण सध्या खूप व्हायरल होत आहे. पुण्यातील पोलिस उपायुक्त असलेल्या या अधिकाऱ्यांच्या अशा कारभाराला वैतागलेल्या कर्मचाऱ्याने त्यांची तक्रार थेट पोलिस महासंचालकाकडे केली आहे. त्या कर्मचाऱ्याने याबाबतचे पत्र आणि ती मोफत बिर्याणीची मॅडमची फर्माईशची आँडिओ क्लिप पोलिस महासंचालकांना पाठविली आहे.
* ऑडिओ क्लिप पाच मिनिटांची
पोलिसांनी आपल्या हद्दीतील हॉटेलमध्ये पैसे का द्यायचे? असा सवालही केलाय. तो कर्मचारी मात्र यापूर्वी आपण नेहमी पैसे देऊनच खाद्यपदार्थ आणल्याचं सांगतोय. अशावेळी मॅडम त्या कर्मचाऱ्याला सर्व खाद्यपदार्थ फुकट आणण्यासाठी बजावत असल्याचं या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे. ही ऑडिओ क्लिप पाच मिनिटांची आहे. यात मॅडम त्या कर्मचाऱ्याला पुण्यातील नाँनव्हेज पदार्थ कुठे चांगले मिळतात, याबाबत विचारणा करतायत. ‘आपण यापूर्वी पैसे देऊनच खाद्यपदार्थ आणतो,’ असे त्या कर्मचाऱ्यांने पोलिस उपायुक्त मॅडमला सांगितले. त्यावर मॅडम म्हणतात की, आपल्या हद्दीत पोलिसांनी हॉटेलमध्ये पैसे का द्यायचे? असा सवाल करीत मी बोलू का? म्हणतायत. त्या हॉटेल चालकाने पैसे मागितल्यास हद्दीतील पोलिस निरीक्षकाकडे तक्रार करा, असंही त्या मॅडम आपल्या कर्मचाऱ्याला सांगत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
‘तुम्ही सांगणार की बोलू’ असेही त्या कर्मचाऱ्याला म्हणाल्या. अखेर मॅडमच्या या कारभाराला त्रस्त होऊन त्या कर्मचाऱ्याने महासंचालकाकडे तक्रार केली आहे. आता पोलिस महासंचालक या पोलिस उपायुक्त मॅडमवर कारवाई करणार का, हे पाहावे लागेल.
* महासंचालकाना पाठविलेल्या पत्रात काय म्हटलंय ?
अधिकाऱ्यांना वेठीस धरून आपल्या पदाचा दुरुपयोग करून जबरदस्तीने पैसे जमा करण्यास सांगतात त्यांचे नाही ऐकले तर त्या पीआयची बदली करण्यासाठी वरिष्ठांकडे आग्रह धरतात. त्यांना पोलिस स्टेशन हद्दीतून सर्व फुकट हवे असते पीआयनी पैसे मागितले तर त्याच्यावर डाव धरून त्याचे नुकसान करतात. यापूर्वी दोन पीआय व एक एसीपी यांचं नुकसान त्यांनी केलं आहे सध्या झोनमधील दोन पीआय याना खूप त्रास देत आहेत त्यांच्यावर योग्य कारवाई करावी कारवाई नाही केली तर पोलिसांचा सहनशिलतेचा अंत होऊ शकतो, अशा अधिकारी इंग्रज काळातील हुकूमशाही गाजवून अधिकारी कर्मचा-यांना वेठीस धरत आहेत, अशा अधिकाऱ्यांना कार्यकारी पदावर दिल्यास हे त्याचा गैरफायदा घेऊन लोकांना हद्दीतील अधिकाऱ्यांना काही करावयास सांगून पोलिसांची जनसामान्यांमध्ये प्रतिममा खराब करत आहेत, असे महासंचालकाना पाठविलेल्या पत्रात म्हटलं आहे.
* महिला डीएसपीचा खुलासा
या क्लिपमधील डीएसपीचे नाव समोर आले असून त्यांनी आपला खुलासा केला आहे. पोलिस आयुक्तालयातील कर्मचारीच आपल्यालाच त्रास देतात,’असा आरोप पुणे पोलिस परिमंडळ एकच्या उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी केला आहे. पोलिस कर्मचारी महेश साळुंखे, आणि ज्ञानेश्वर पालवे यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. मी शिस्तप्रिय अधिकारी असून मी इथे आल्यामुळे अनेकांचे हितसंबध दुखावले गेले आहेत. हप्ता वसुलीचे त्यांचे रॅकेट आहे, असा गैाप्यस्फोट नारनवरे यांनी केला आहे. प्रियंका नारनवरे म्हणाल्या की, ही मॉर्फ ऑडिओ क्लिप आहे. यातील संदर्भ जुना आहे. माझ्या कार्यालयात जे पोलिस अधिकारी, कर्मचारी दहा-दहा वर्ष झाले ते हप्ता वसुल करायचे, असा आरोप केला आहे.