पुणे : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे मेट्रो आज प्रत्यक्ष ट्रॅकवर उतरली. आज कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनी या टप्प्याची चाचणी झाली. तसेच मेट्रो प्रत्यक्षात धावली. मेट्रो ट्रायल रनचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. आता ऑक्टोबर अखेरपर्यंत मेट्रो प्रवाशांसाठी सुरू होऊ शकते.
गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेली पुणे मेट्रो अखेर शुक्रवारी सकाळी प्रत्यक्षात धावताना पाहायला मिळाली. गेल्या काही महिन्यांपासून पुणे मेट्रोच्या वेगवेगळ्या टप्प्यांची कामं समांतर पद्धतीने करण्यात येत आहेत. याआधी वनाज ते रामवाडी या भागाची चाचणी 7 जुलै रोजी घेण्यात आली होती. त्यानंतर आता वनाज ते आयडियल कॉलनी या टप्प्याची चाचणी केली.
या टप्प्यातील मेट्रो ट्रायल रनचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. मेट्रोकडून याच मार्गावर काही दिवसांपूर्वी सरावपूर्व चाचणी घेण्यात आली होती. चाचणीनंतर ऑक्टोबर अखेरपर्यंत मेट्रोची प्रवासी सेवा सुरू करण्याचे महामेट्रोच्या विचाराधीन आहे.
पुणेकरांचं मेट्रो ट्रेनचं कित्येक वर्षाच स्वप्न आता साकार होताना दिसतयं. आज सकाळी 7 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे महानगरपालिका क्षेत्रातील वनाज ते रामवाडी कॉरिडॉरमधील पूर्ण झालेल्या मार्गिकेवरील पुणे मेट्रोच्या ईस्ट-वेस्ट कॉरिडॉरच्या ट्रायल रनचे उद्घाटन झालं. यावेळी अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
‘पुणे मेट्रोमुळे रस्त्यावरचा वाहनांचा, वाहतुकीचा, प्रदुषणाचा ताण कमी होईल. वाहतुक कोंडी सुटण्यास मदत होईल.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पुणेकर त्यांच्या निर्धारित ठिकाणी, निर्धारीत वेळेत पोहोचू शकतील. दुसऱ्याला दिलेली वेळ आणि वेळेचं गणित, पुणेकर भविष्यात पाळू शकतील,’ असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला.
‘पुणेकरांना निर्धारीत वेळेत इच्छित ठिकाणी पोहोचवणाऱ्या वाहतूक व्यवस्थेसोबतच पुणेकरांचे वेळेचे गणित जुळवून आणणाऱ्या वाहतूक आधुनिक व्यवस्थेची ही ट्रायल रन आहे. या ट्रायल रनच्या निमित्ताने पुणेकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल,’ असंही अजित पवार म्हणालेत.
यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेता गणेश बिडकर, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, महा मेट्रोचे ब्रिजेश दीक्षित, जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
‘महामेट्रोच्या माध्यमातून पुणे शहरात सुरु असणारे मेट्रो रेल्वेंचे काम निर्णायक टप्प्यावर आहे. लॉकडाऊनच्या काळातही काम सुरु होते. 60 टक्के काम आजच्या घडीला पूर्ण झाले आहे. अत्यंत वेगाने,विश्वासाने, निर्धाराने,कोणताही अपघात न होता, हे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीट करून याची माहिती दिली होती. पुणे मेट्रोच्या या टप्प्याची चाचणी शुक्रवारी सकाळी 7 वाजता केली जाणार असून त्यावर “संकल्पातून सिद्धीकडे; पुणे मेट्रोची उद्या ट्रायल!” असं ट्वीट महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलं होतं.