सोलापूर : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव तथा आबासाहेब देशमुख (वय 97) याचं आज शुक्रवारी रात्री निधन झालं आहे. गणपतराव यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून सोलापुरातील अश्विनी सहकारी रुग्णालयात उपचार सुरु होते.
गणपतराव देशमुखांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांनी याबाबत माहिती दिली आहे. “आबासाहेबांच्या जाण्याने आमच्या देशमुख कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. राजकारणामध्ये ज्यांनी त्यांच्यासोबत काम केलं, त्यांच्या सर्वांसाठी हा मोठा धक्का आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादांमुळे आबासाहेबांची प्रकृती आतापर्यंत चांगली होती. पण आज संध्याकाळी रात्री नऊ वाजता आबासाहेबांचं निधन झालं”, अशी माहिती अनिकेत देशमुख यांनी दिली.
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दिपस्तंभ म्हणून ज्यांची ओळख असली पाहिजे ते म्हणजे परंपरागत दुष्काळी सांगोला तालुक्यातील ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते देवेंद्र फडणवीसांपर्यंतच्या मुख्यमंत्र्यांचं काम त्यांनी जवळून पाहिले आहे. एक व्यक्ती, एकच पक्ष आणि एकच मतदारसंघ आणि 11 वेळा आमदार हे उदाहरण महाराष्ट्राच्या राजकारणात कुठे ही पहायला मिळणार नाही.
एकच शेतकरी कामगार पक्ष, एकच मतदारसंघ सांगोला विधानसभा मतदारसंघ आणि एकच उमेदवार गणपतराव देशमुख महाराष्ट्रात असं उदाहरण दुर्मिळच आहे. आजोबांपासून नातवाचेही मतदान गणपतराव यांना मिळाले आहे. आयुष्यातील 50 वर्ष त्यांनी विधानसभेतील अनेक मुख्यमंत्री आणि मंत्री यांचे काम पाहिले. तसंच आपल्या कामाचा ठसा सुद्धा त्यांनी राज्यातील राजकारणात उमटवला.
गणपतराव देशमुख यांचा जन्म 10 ऑगस्ट 1926 रोजी झाला. अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतराव देशमुख यांनी तब्बल 54 वर्षे सांगोला मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. एकाच मतदारसंघातून विधानसभेवर सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा विक्रम शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या नावावर आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून 11 वेळा त्यांनी विक्रमी विजय मिळवून आमदारकी मिळवली. ही त्यांच्या कार्याची पोचपावती होती.
2009 च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून, करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे गणपतराव तथा आबासाहेब देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले. आबासाहेब देशमुखांनी सांगोल्यातून सगळ्यात पहिल्यांदा 1962 च्या निवडणुकीत विजय मिळवला. त्यानंतर 1972 आणि 1995 या दोन पंचवार्षिक वगळता प्रत्येक विधानसभा निवडणुकीत सांगोल्यातील जनतेने त्यांच्या निस्सीम प्रेम करुन आमदार म्हणून स्विकारले. 2019 च्यावेळी त्यांना आमदारकी लढवण्यासाठी जनतेने रेटा लावला होता. पण तब्येतीमुळे त्यांनी थांबणे पसंत केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गणपतराव देशमुख हे बहुतांश काळ विरोधी बाकांवरच होते, मात्र 1978 मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापन केले. त्यावेळी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. त्यानंतर 1999 मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हाही गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता.
महाराष्ट्र विधानसभेवर सर्वाधिक काळ निवडून गेलेले कर्तव्यदक्ष आमदार असा त्यांचा लौकीक होता. सत्यशोधकी विचारांवर त्यांनी आयुष्यभर वाटचाल केली. त्यांचे संपूर्ण आयुष्य कृतीशील विचारांचा वस्तुपाठ असल्याचे म्हणत राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सहवेदना व्यक्त केल्या.
त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये विविध खात्याचे मंत्री म्हणूनही काम पाहिले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अतिशय महत्वाचे व महाराष्ट्राच्या विकासावर सकारात्मक परिणाम करणारे निर्णय घेतले.त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील एक ऋषीतुल्य व्यक्तीमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले. भावपूर्ण श्रद्धांजली.