सोलापूर : सांगोल्याचे माजी आमदार, माजी मंत्री, शेकापचे जेष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्यावर आज शनिवारी दुपारी शासकीय इतमामात सांगोला शेतकरी सहकारी सूतगिरणी येथील मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. काल शुक्रवारी (ता. ३० जुलै) रात्री साडेनऊ वाजल्याच्या दरम्यान गणपतराव देशमुख यांचे सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.
सांगोला महिला सूतगिरणीच्या मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आज शनिवारी सकाळी सोलापूर येथून त्यांचे पार्थिव मोहोळ तालुक्यातील पेनूर या त्यांच्या मूळ गावी आणण्यात आले. त्यानंतर सांगोला तालुक्यातील गावागावात नागरिकांना आबासाहेबांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. घरी विधी झाल्यानंतर पुन्हा सजवलेल्या रथामध्ये सांगोला सूतगिरणीकडे अंत्ययात्रा काढण्यात आले. अनेकांनी दुतर्फा गर्दी करुन दर्शन घेतले. अंत्ययात्रेत जवळपास 25 हजार लोक सहभागी झाल्याचे वृत्त आहे. ‘अमर रहे अमर रहे आबासाहेब अमर रहे’ च्या घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला. यावेळी अनेकांच्या अश्रुंचे बांध फुटले. महिलांना तर अश्रू अनावर झाले.
गणपतराव देशमुखांवर प्रेम करणारे अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या अश्रुंचा बांध यावेळी फुटला. आबासाहेब अमर रहे च्या घोषणांनानी परिसर दुमदुमून गेला. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार शहाजीबापू पाटील, बबनराव शिंदे, समाधान आवताडे, अनिल बाबर, शेकापचे जयंत पाटील, सचिन कल्याणशेट्टी, प्रशांत परिचारक, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार सुमनताई पाटील, सांगलीचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी, सांगोल्याच्या नगराध्यक्ष राणीताई माने, माजी खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री अण्णा डांगे, प्रा. राम शिंदे, लक्ष्मणराव ढोबळे, माजी आमदार रामहरी रुपनवर, राजन पाटील, दीपक साळुंखे-पाटील, प्रकाश शेंडगे, नारायण पाटील, बाळाराम पाटील, राजेंद्र देशमुख, दत्तात्रय सावंत, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उत्तमराव जानकर आदींनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गणपतराव देशमुखांचे ज्येष्ठ सुपूत्र पोपट देशमुख, चंद्रकांत देशमुख, नातू डॉ. बाबासाहेब आणि अनिकेत देशमुख यांनी गणपतराव देशमुख यांच्या मृतदेहाला भडाग्नी दिला.त्यांच्या पत्नी रतनबाई देशमुख यांना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते तिरंगा ध्वज देण्यात आला.
यावेळी आमदार शहाजीबापू पाटील, अनिल बाबर, शेकापचे जयंत पाटील, प्रशांत परिचारक, आमदार सुमनताई पाटील, अनिल बाबर, अण्णा डांगे, रामहरी रुपनवर, दीपक साळुंखे-पाटील, प्रकाश शेंडगे, नारायण पाटील, वाळव्याचे वैभव नाईकवडी, बाबा कारंडे यांनी गणपतराव देशमुख यांच्याबद्दल शोक भावना व्यक्त केल्या.
त्यांच्या निधनाने महाराष्ट्रच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. गणपतरावांच्या निधनानंतर महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गज नेत्यांनी आपला शोक व्यक्त केला आहे.
* गणपतराव देशमुख यांच्या नावे शासकीय योजना – पालकमंत्री भरणे
राज्यसरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात येणाऱ्या योजनेला भाई गणपतराव देशमुख यांचे नाव द्यावे अशी मागणी शेकापचे आमदार जयंत पाटील , माजी मंत्री महादेव जानकर यांनी केली. यावर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तात्काळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याना बोलून तशी योजना तयार करून भाईचे नाव देण्याची घोषणा केली.
यावेळी पालकमंत्री भरणे यांनी बोलताना सांगितले की, गणपतराव देशमुख यांच्या निधनाने संपूर्ण राज्यासह, जिल्ह्याचे नुकसान झाले आहे. सर्वसामान्य नेते आणि सामान्यांचे नेते, अशी ओळख त्यांची होती. तरुण पिढीला त्यांच्या कार्याची माहिती व्हावी, आदर्श रहावा म्हणून राज्य शासन गणपतराव देशमुख यांच्या नावाने शासकीय योजना सुरू करेल, अशी घोषणा त्यांनी केली.