Day: August 2, 2021

  • बारावीचा निकाल उद्या चार वाजता लागणार, पहा याठिकाणी निकाल

    बारावीचा निकाल उद्या चार वाजता लागणार, पहा याठिकाणी निकाल

    मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणा-या बारावीच्या निकालाची मोठी उत्सुकता विद्यार्थ्यांसह पालकांना लागली होती. 31 जुलैपर्यंत हा निकाल जाहीर होणार असं सांगण्यात येत होत. मात्र, आता उद्या मंगळवारी (3 ऑगस्ट) दुपारी 4 वाजता हा निकाल जाहीर होणार असल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवरुन सांगितलं आहे.

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या निकालाचीही उत्सुकता वाढली आहे.  बारावीच्या निकालापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून विद्यार्थ्यांचे परीक्षा क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. विद्यार्थी http://mh-hsc.ac.in या वेबसाईटवर भेट देऊन त्यांचा बैठक क्रमांक मिळवू शकतात.

    2 जुलै 2021 रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार सन 2021 मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) परीक्षेस श्रेणीसुधार योजनेतंर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आलेला नाही. सदर विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधीमध्ये या परीक्षेची गणना करण्यात येणार नाही. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांना पुढील एक /दोन संधी उपलब्ध राहतील.

    तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

    कोरोनामुळे यावर्षी राज्य मंडळाच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. दहावी, अकरावी व बारावीच्या अंतर्गत गुणमापन पध्दतीनुसार यावर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मुल्यमापन व मुल्याकंन एका वेगळ्या धर्तीवर केले होते व त्यानुसार गुणांकन करण्यात आले आहे. अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय प्राप्त गुण तसेच इ.12 वी चे अंतिम तोंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत व तत्सम मूल्यमापनातील प्राप्त गुण या नुसार निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

    उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षा सन 2021 साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण जाहीर केलेल्या संकेतस्थळांवर पाहता येतील. तसेच माहितीची प्रतही घेता येईल.

    बारावीची परीक्षा रद्द झाल्यामुळे राज्य मंडळातर्फे अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर केला जात आहे. राज्य मंडळाच्या सूचनेनुसार शाळांनी संगणकीय प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांचे गुण जमा केले आहेत. आता विभागीय मंडळाकडून प्राप्त गुणांचे संकलन राज्य मंडळकडून केले जात आहे. बारावीच्या निकालांबाबत अनेक अफवा पसरल्या होत्या. मात्र, आता निकालाची तारीख निश्चित झाली आहे.

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2021 मध्ये मंडळाच्या कार्यपद्धती नुसार तयार करण्यात आलेला इ.12 वीचा निकाल 3 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे. स्वत: शिक्षणमंत्र्यांनी ट्विट करुन याची घोषणा केली आहे.
    इथे पाहा निकाल

    mahahsscboard.in

    https://msbshse.co.in

    https://hscresult.11thadmission.org.in

    http://hscresult.mkcl.org

    http://mahresult.nic.in

  • राज्यात किराणा दुकानातही मिळणार वाइन; येणार या ऑगस्ट महिन्यात नवे धोरण

    राज्यात किराणा दुकानातही मिळणार वाइन; येणार या ऑगस्ट महिन्यात नवे धोरण

    मुंबई : द्राक्षापासून तयार करण्यात येणाऱ्या मद्याचा खप वाढावा म्हणून ठाकरे सरकारने एक विशेष धोरण तयार केले आहे. त्याबाबतची अधिसूचना ऑगस्ट महिन्यात प्रसिद्ध जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत राज्यातल्या वाइनवर आकारले जात नसलेले उत्पादन शुल्क आता 10 टक्के दराने आकारले जावे. तसेच, किराणा व सुपरमार्केट्समध्येही स्वतंत्र विभाग करून वाइनची विक्री करण्याला परवानगी देण्याचे या धोरणात आहे.

    महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादकांकडून अधिक प्रमाणात वाइनचे उत्पादित केले जाते. याचा खप वाढण्यासाठी राज्य शासनाने एक विशेष धोरण आखत असल्याचे वृत्त आहे. याबाबत राज्य सरकारकडून या चालू ऑगस्ट महिन्यात अधिसूचना जारी करण्याची शक्यता आहे. तसेच या धोरणामध्ये राज्यातील वाईनवरील विशेष कर आकारलं जात नसल्याने आता त्यावर 10 % प्रमाणे कर करण्याचा प्रस्ताव या धोरणामध्ये आहे. आता आजतागायत फक्त वायनरीमध्येच उघडता येत असलेली वाइनची रिटेल आउटलेट आता स्वतंत्रपणेही सुरू करता यावी, तसेच, किराणा दुकान, सुपरमार्केट्समध्ये देखील स्वतंत्र विभाग करून वाइनची विक्री करता येणं शक्य होणार असल्याचा अंतर्भाव या नव्या धोरणात आहे.

    एका वृताद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, 2005 मध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वाइनचं वर्गीकरण मद्य म्हणून केलं जात असल्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. तेव्हा वाइन किराणा दुकानांतही उपलब्ध होण्याच्या बाजूने मत व्यक्त केलं होतं. वाइनला दारू समजलं जात असल्यामुळे आतापर्यंत वाइनवर उत्पादन शुल्क आकारलं जात नसूनही तिचा खप मात्र त्या उद्योगासाठी समाधानकारक नाही.

    तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

    2020-21 च्या आकडेवारीनुसार भारतात उत्पादित झालेल्या परदेशी मद्याची विक्री 200 दशलक्ष लिटर इतकी झाली. देशी दारूची विक्री 320 दशलक्ष लिटर, बीअरची 30 कोटी लिटर, तर वाइनची फक्त 7 लाख लिटर इतकीच विक्री झालीय.

    ‘वॉक-इन स्टोअर’ या वर्गात किरकोळ दुकाने, किराणा दुकानं, सुपरमार्केट्स आदींचा देखील समावेश होऊ शकेल.
    फक्त वाइन बार्सही उघडता येऊ शकतील. या ऑगस्ट महिन्यात या धोरणाची अधिसूचना निघण्याची शक्यता आहे. तसेच, या धोरणातल्या इतर घटकांबाबतची सविस्तर माहितीही लवकरच जाहीर केली जाणार आहे.

    दरम्यान, मद्य म्हणून वाइनचं वर्गीकरण हे एक कारण झालं.
    वाइनपेक्षा मद्य पिण्याला लोकांचं प्राधान्य आहे. सध्या तरी वायनरीजशिवाय इतर कोठेही वाइनची किरकोळ विक्री करता येत नाही. किरकोळ वाइन विक्रीची लायसेन्स इतर किरकोळ विक्रेत्यांना दिली, तर फक्त वाइनची रिटेल आउटलेट्सही उघडता येऊ शकतील.
    असं एका अधिकाऱ्याने सांगितल्याचे समजते.

    * उत्पादित वाइनवर 10 टक्के उत्पादन शुल्क आकारण्याचा प्रस्ताव

    मागील वीस वर्षं महाराष्ट्रात उत्पादित वाइनवर उत्पादन शुल्क आकारलं जात नव्हतं. आता ते 10 टक्के आकारण्याचा प्रस्ताव आहे. दरम्यान, यामधून मिळणारी काही रक्कम वाइन बोर्डाला देण्याचा सरकारचा विचार आहे. वाइन हे आरोग्यदायी पेय असून, त्याच्या विक्रीत वाढ झाली तर कृषी-अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल. वाइन उद्योगाची उलाढाल 1 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्यासाठी 25 वर्षं लागली. आगामी वाटचाल गतीने करण्याचं उद्दिष्ट असून, 2026 पर्यंत या उद्योगाची उलाढाल 5 हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट असल्याचं अखिल भारतीय वाइन उत्पादक संघटनेच्या प्रतिनिधीने सांगितलं आहे.

  • माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेंच्या आरोपास काँग्रेस नेत्यांकडून प्रत्युत्तर

    माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेंच्या आरोपास काँग्रेस नेत्यांकडून प्रत्युत्तर

    सोलापूर : कन्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या मंत्रिपदाला अडथळा ठारु नये म्हणून ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनीच अक्कलकोटचे सिध्दाराम म्हेत्रे यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत केले, असा गंभीर आरोप माजी मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे नेते लक्ष्मण ढोबळे यांनी सोलापुरात एका मंचावर केला होता. यावर आता सुशीलकुमार शिंदेंसह काँग्रेस नेत्यांनी ढोबळेंवर टीकेची झोड उठवली आहे. वाचा कोण काय म्हणाले.

    आपला विरोधातील उमेदवार कोण असावा, हेही सुशीलकुमार शिंदे हेच ठरवत होते. आपल्या मुलीच्या मंत्रीपदाला अडथळा होऊ नये; म्हणून त्यांनी सिद्धाराम म्हेत्रे यांनाही निवडणुकीत पराभूत केले. तसेच, ताई तुम्ही एकदा शहर मध्य सोडून शहर उत्तरमध्ये निवडणूक लढवा. एकदा होऊन जाऊद्या, असे आव्हानही ढोबळे यांनी आमदार प्रणिती शिंदे यांना दिले होते. ढोबळेंनी हा मुद्दा का उपस्थित केला माहीत नाही, पण आता यावर काँग्रेस नेते आक्रमक झाले आहेत.

    प्रतिउत्तर देताना माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नामोल्लेख टाळत ढोबळेंच्या टीकेकडे दुर्लक्ष करण्याचाच सल्ला दिला. लक्ष्मण ढोबळे यांची ताकद भाजपला माहिती आहे. त्यामुळे त्यांना पक्षात कोणीच काही किंमत देत नाहीत. त्यातूनच ते वारंवार अशा प्रकारची वक्‍तव्ये करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी अशी बेताल वक्‍तव्य करण्यापेक्षा विकासकामांवर बोलावे आणि त्यांनी सोलापूर शहरात ढवळाढवळ करण्यापेक्षा त्यांच्या मतदारसंघाकडे लक्ष द्यावे, असा सल्ला काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी दिला.

    तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांना मुलाप्रमाणे मानतात. ज्या पक्षाने लक्ष्मण ढोबळेंना मोठे केले, त्या पक्षाला सोडून पक्षांतर करणाऱ्या ढोबळेंना लोक चांगलेच ओळखून आहेत. त्यामुळेच त्यांनी त्यांचा मतदारसंघ सोडून शहराकडे लक्ष द्यायला सुरवात केली आहे. चापुलसगिरी करणाऱ्या ढोबळेंना हे बोलणे शोभत नाही, असा काँग्रेसचे सोलापूर शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी समाचार घेतला आहे.

    निवडणुकीनंतर लक्ष्मण ढोबळेंनी आताच हे वक्‍तव्य का केले, हा संशोधनाचा भाग आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी कधीच कोणाबद्दल द्वेष ठेवला नाही. शहराच्या विकासात त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्यामुळेच शहराच्या पिण्याच्या पाण्याची दुहेरी पाईपलाईन होत असल्याचे ढोबळेंनी विसरू नये, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक ऍड. यु. एन. बेरिया यांची आठवण करुन दिली.

    सोलापूर स्मार्ट सिटीत येण्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांचे योगदान सोलापूकरांना माहिती आहे. काँग्रेसने पहिलीच बैठक शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात घेतली. त्यामुळे भाजप नेत्यांच्या पायाखालील वाळू सरकरली आहे. कोणाची तरी मर्जी राखण्यासाठी लक्ष्मण ढोबळे यांनी हे वक्‍तव्य केले आहे, असा टोला माजी महापौर संजय हेमगड्डी यांनी लगावला.

  • पंतप्रधान मोदींनी लाँच केले पेमेंट प्लॅटफॉर्म ई-रुपी, काय आहेत फायदे

    पंतप्रधान मोदींनी लाँच केले पेमेंट प्लॅटफॉर्म ई-रुपी, काय आहेत फायदे

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवारी ई-वावचर आधारित कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस डिजिटल पेमेंट सॉल्युशन e RUPI लाँच केले आहे. यामुळे देशात डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अधिक प्रभावी बनविण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडली जाईल, असा विश्वास मोदी यांनी यावेळी व्यक्त केला. कॅशलेस पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी ई-रुपीची सुरुवात करण्यात आली आहे.

    21 व्या शतकातील भारत आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आणि तंत्रज्ञानाला लोकांच्या जीवनाशी कसे जोडत आहे याचे ई-रुपी हे देखील प्रतीक आहे. जर कोणतीही सामान्य संस्था किंवा संस्था कोणत्याही उपचार, शिक्षण किंवा इतर कामासाठी मदत करू इच्छित असेल, तर ती रोख ऐवजी ई-रुपी देऊ शकेल. हे सुनिश्चित करेल की त्याने दिलेला पैसा त्याच कामासाठी वापरला जाईल ज्यासाठी ती रक्कम दिली गेली आहे.

    पंतप्रधान मोदी म्हणाले की, सुरुवातीच्या टप्प्यात ही योजना देशातील आरोग्य क्षेत्राशी संबंधित लाभांवर लागू केली जात आहे. कालांतराने, त्यात आणखी गोष्टी जोडल्या जातील. उदाहरणार्थ, जर कोणाला उपचारावर खर्च करायचा असेल, कोणाला टीबी रुग्णांना योग्य औषधे आणि अन्नासाठी आर्थिक मदत द्यायची असेल किंवा मुले आणि गर्भवती महिलांना अन्न किंवा पर्यावरणाशी संबंधित इतर सुविधा पुरवायच्या असतील तर त्यांच्यासाठी ई-रुपी आहे. खूप उपयुक्त ठरेल.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पूर्वी काही लोकांना आपल्या देशात हवे होते आणि ते असेही म्हणायचे की तंत्रज्ञान ही फक्त श्रीमंतांची गोष्ट आहे, भारत हा गरीब देश आहे, त्यामुळे भारतासाठी तंत्रज्ञानाचा काय उपयोग आहे. जेव्हा आमच्या सरकारने तंत्रज्ञानाला मिशन बनवण्याविषयी बोलले तेव्हा अनेक राजकारणी आणि काही तज्ञांनी प्रश्न उपस्थित केले. 21 व्या शतकात प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने आणि लोकांना जोडताना भारत कसे पुढे जात आहे याचे एक उदाहरण म्हणजे ई-रुपया. मला आनंद आहे की जेव्हा भारताची स्वातंत्र्याची 75 वी जयंती साजरी होते तेव्हा त्याची सुरुवात झाली.

    तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

    देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ई-व्हाउचर-आधारित डिजिटल पेमेंट सोल्यूशन ई-रूपी ( e-RUPI) लाँच केले आहे. e-RUPI हे प्रीपेड ई-व्हाउचर आहे, जे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने विकसित केले आहे. याद्वारे कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस पेमेंट केले जाईल. सरकारच्या मते, याद्वारे योजनांचा लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत नेण्यास मदत होईल. ही सेवा वित्तीय सेवा विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आली आहे.

    * याचे फायदे नेमके काय आहेत. पुढीलप्रमाणे फायदे

    – यामुळे सरकारी योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत जाईल. यामुळे भ्रष्टाचार कमी होईल.

    – ही एक QR कोड किंवा SMS स्ट्रिंग-आधारित ई-व्हाउचर आहे. जे लाभार्थ्यांच्या मोबाइलवर थेट पाठवले जाईल.

    – या वन टाईम पेमेंट सर्विसमध्ये युजर्स कोणत्याही कार्ड, डिजिटल पेमेंट अॅप किंवा इंटरनेट बँकिंगशिवाय व्हाउचर REEDEM करू शकतील.

    – e-RUPI द्वारे, सरकारी योजनांशी संबंधित विभाग किंवा संस्था कोणत्याही फिजिकल कॉन्टॅक्टशिवाय लाभार्थी आणि सर्विस प्रोवाइडरशी थेट जोडल्या जातील.

    – ई-रुपी हे देखील सुनिश्चित करते की व्यवहार पूर्ण झाल्यानंतरच सर्व्हिस प्रोव्हाडरला पैसे दिले जातील.

    – प्री-पेड असल्याने, सेवा पुरवणाऱ्याला कोणत्याही मध्यस्थांच्या सहभागाशिवाय वेळेवर पैसे देण्याचे आश्वासन ई-रुपी देते.

    – या डिजिटल व्हाउचरचा उपयोग खाजगी क्षेत्र देखील आपल्या कर्मचारी कल्याण आणि कॉर्पोरेट कार्यक्रमांचा भाग म्हणून घेऊ शकते.

  • आता नवीन स्वरुपात सातबारा; जमिनीच्या खोट्या नोंदी करता येणार नाहीत

    आता नवीन स्वरुपात सातबारा; जमिनीच्या खोट्या नोंदी करता येणार नाहीत

    पुणे : नवीन डिजिटल युगात नागरिकांना सहज, पारदर्शक व बिनचूक सुविधा उपलब्ध करण्यासाठी महसूल विभाग कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते रविवारी (१ ऑगस्ट ) महसूल दिनानिमित्त एका कार्यक्रमात बोलत होते.

    डिजीटल स्वाक्षरीत फेरफार वितरण व सुधारित नमुन्यातील सातबारा वितरण आणि महसूल,नोंदणी व मुद्रांक विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर यांच्या हस्ते ई-मिळकत पत्रिका ऑनलाईन फेरफार प्रणाली दस्त नोंदणी प्रक्रियेशी संलग्न करणे या महसूल विभागाच्या नविन ऑनलाईन सुविधांचा शुभारंभ काल पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात कळ दाबून करण्यात आला.

    यावेळी, ‘सात बारा काढण्यासाठी 15 रुपये रक्कम भरावी लागेल. बँकांसोबत करार करणार आहे. बँक पण सात बारा काढू शकतील. त्याचा नागरिक लाभ घेऊ शकतील. खोट्या नोंदी करता येणार नाही. फोटो आणि लोकेशन मिळेल. गैरप्रकार होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल. अडचणी आल्या तर आम्हाला समजलं पाहिजे. दोष समोर आले तर त्या त्या वेळी ते सोडवू,’ थोरातांनी नमूद केलं.

    तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

    नागरिकांना सेवा सहज व जलदगतीने सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी कायद्यामध्ये बदल करावे लागतात. त्याच बरोबर काही कायदे रद्दही करावे लागतात. १ ऑगस्टपासून नागरिकांना नवीन स्वरुपात सातबारा करुन देण्यात आलेला आहे. पुढील काळात विभागाच्यावतीने सातबारा सोबत फेरफार संगणीकृत पद्धतीने उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न असणार आहे. विभागाने अधिकचे चांगले काम करून नागरिकांना जलदगतीने उपलब्ध करुन देण्यासाठी कटिबद्ध असले पाहिजे, असे देखील थोरात यांनी नमूद केलं.

    ‘ई पीक पाहणी सुद्धा सुरू आहे. स्वतःच शेतकरी नोंद करू शकणार आहेत. त्याचं उद्घाटन मुख्यमंत्री करणार आहेत. तलाठी त्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे. काही तालुक्यांमध्ये याला चांगला प्रतिसाद मिळतोय. टाटा ट्रस्टची मदत मिळत आहे. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. यामुळे पिकांची लागवड कळणार आहे. विमा कवच, अनुदान आणि कर्जाची माहिती देखील मिळणार आहे,’ असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

  • राज्यातील दुकाने ८ वाजेपर्यंत सुरू राहणार : मुख्यमंत्री, सांगलीत  घोषणा आणि स्टंटबाजी

    राज्यातील दुकाने ८ वाजेपर्यंत सुरू राहणार : मुख्यमंत्री, सांगलीत घोषणा आणि स्टंटबाजी

    सांगली : जिल्ह्यातील पुरग्रस्त गावांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेटी दिल्या. सोमवारी सकाळी त्यांनी पलूस तालुक्यातील भिलवडी, अंकलखोप या गावांना भेटी देऊन ग्रामस्थांशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी दरवर्षी येणाऱ्या महापूर आपत्ती व्यवस्थापनासाठी काही कटू निर्णय घ्यावे लागतील, त्यासाठी तुमची साथ महत्वाची असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. यावेळी राज्यातील दुकानांची वेळ वाढवण्याचाही निर्णय घेतला.

    मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, अनेकांचे संसार उद्ध्वस्त कोरोनामुळे झाले आहेत. अतिवृष्टीचा अंदाज आला त्याच क्षणापासून प्रशासनाने काम सुरू केले. सांगलीच्या या भागात ४ लाख लोकांचे स्थलांतर केले. प्राधान्यक्रम जीवितहानी न होण्याला
    मला विश्वजित कदम यांनी पूर कुठपर्यंत वाढला होता ते दाखवले. लोकांचे आर्थिक आणि शेतीचे नुकसान झाले आहे. मी तळिये, चिपळूण, कोल्हापूर या ठिकाणी पूरग्रस्त भागाचा दौरा केला आहे, नुकसान पाहिले आहे.

    तुमच्या सर्वांच्या साथीने मी मार्ग काढणारच, आपल्याला नम्र विनंती आहे किती नुकसान झाले आहे त्याचे सगळी आकडेवारी मिळते आहे. शेती, घरे दारे एकूणच किती नुकसान झाले, याचा अंदाज घेणे सुरू आहे. काही ठिकाणी कायमस्वरूपी तोडगा काढावा लागेल. कटू निर्णय घ्यावे लागतील , आपली त्याला तयारी हवी. कारण दर वर्षी हे पूरांचे संकट येणार आणि आपण त्यातून उभे राहणार की परत दुसऱ्या वर्षी तेच. दरवर्षी पाण्याच्या पातळ्या मोजण्यात आयुष्य घालवायचे नाही. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. सरकार म्हणून जे आपल्या हिताचे आहे ते करणारच, असं काही झाले की लगेच पॅकेज जाहीर केले जाते. मग त्यातला पैसा कुठे जातो ते कळत नाही. मला प्रामाणिकपणे आपल्यासाठी काम करायचे आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपल्या सूचनांचा नक्की विचार करू, असे आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.

    तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

    * राज्यातील दुकाने ८ वाजेपर्यंत सुरू राहणार : मुख्यमंत्री

    राज्यातील ज्या जिल्ह्यातील रुग्ण संख्या कमी झाली आहे, त्या ठिकाणी दुकाने आठ वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र ज्या जिल्ह्यात रुग्ण संख्येत वाढ होत आहे, त्याठिकाणी निर्बंध जैसे थे राहतील, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगलीत पत्रकार परिषदेत दिली.

    सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, राज्यातील दुकाने आठ वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी मिळावी अशी मागणी होत होती. याबाबत आज आदेश देण्यात येतील. परंतु ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढ होत आहे.

    त्याठिकाणी मात्र निर्बंध जैसे थे राहणार आहेत. आगामी काही महिन्यात कोरोना ची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून याबाबत निर्बंध कठोर करण्याबाबत केंद्र सरकारने देखिल सूचना केल्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. खासगी कार्यालयांनी देखील आपल्या वेळेत बदल करून गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच गरज वाटल्यास 24 तास कार्यालय सुरू ठेवा मात्र गर्दी टाळा अशा सूचना देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केल्या.

    * घोषणा आणि स्टंटबाजी

    घोषणाबाजी करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे काय, निवेदन द्या म्हणून मुख्यमंत्री उध्दव जी ठाकरे यांनी स्वतः हुन पुढाकार घेतला पण निवेदन देणे, मागण्या काय आहेत ते बोलण्यापेक्षा घोषणा आणि स्टंटबाजी करण्यात त्यांना वेळ घालवायचा होता. मुख्यमंत्र्यांनी सांगलीत प्रत्येक दोन फूट पाणी वाढल्यानंतर कुठल्या भागाचे किती नुकसान झाले याची आयर्विन पुलावर उभे राहून माहिती घेतली. प्रत्येक पूरग्रस्त व्यक्तीला शासकीय मदत पोहोचली पाहिजे, पुनर्वसन बद्दल प्रशासनाची माहिती जाणून घेतली, व्यापारी आणि जनता यांच्याशी सुसंवाद करून पुढचा प्लॅन ठरवा असे आदेश दिले आणि व्यापारी व जनतेचे म्हणणे ऐकण्यासाठी ते बाजार पेठेच्या मध्यभागी पोहोचले होते.

    व्यापारी आणि जनतेचे म्हणणे त्यांच्यापर्यंत पोहोचू नये म्हणून भाजपने ही स्टंटबाजी केली. आणि वरून बोंब ठोकली. त्यांना स्टंट च करायचा होता. सांगलीकर जनता पूरग्रस्त आणि व्यापारी या सर्वांचा भाजपने अपमान केला आहे. मुख्यमंत्री उध्दव साहेब यांच्यापर्यंत जनतेचे म्हणणे पोहोचू नये असा त्यांचा डाव होता. त्यासाठीच त्यांनी हे नाटक केले त्या पापाचे माप जनता योग्य वेळी भाजपच्या पदरात घालणार आहे. शिवसेनेने हर भट रोड वर माईक सह सर्व व्यवस्था केली होती. व्यापारी आणि जनता मुख्यमंत्री उध्दव साहेबांच्या बरोबर सहज संवाद साधू शकवी आणि मुख्यमंत्र्यांचे म्हणणे त्यांच्यापर्यंत पोहोचावे याची व्यवस्था आम्ही केली होती. 2019 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री यांनी सांगलीला वाऱ्यावर सोडले होते तर उध्दव जी एका निर्धाराने सांगलीत आले होते. त्यामुळे त्यांचे म्हणणे जनते पर्यंत पोहोचू नये आणि भाजप पक्षाच्या मुख्यमंत्री महोदयांनी काहीच केले नाही हे जनतेचे म्हणणे दृढ होऊ नये म्हणून भाजप तर्फे स्टंट करण्यात आला हे सांगलीची जनता आणि व्यापारी ओळखून आहेत. योग्य वेळी त्यांना जनता धडा शिकवेल.

    * शंभूराज काटकर

    शिवसेना उप जिल्हाप्रमुख, सांगली

  • येथे किस कराल तर सावधान! आता ‘नो किसिंग झोन’

    येथे किस कराल तर सावधान! आता ‘नो किसिंग झोन’

    मुंबई : तुम्ही नो पार्किंग झोन, नो स्मोकिंग झोन अशा झोनबाबत ऐकलं असेल. परंतू कधी नो किसिंग झोनबद्दल ऐकलं आहे का? मुंबईच्या बोरिवली भागात काही स्थानिक नागरिकांनी जॉगर्स पार्क परिसरात या झोनची घोषणा केली आहे.

    नागरिकांनी रस्त्यावर पिवळ्या रंगामध्ये ‘नो किसिंग झोन’ लिहून संबंधित परिसरात किसिंग करण्याला मज्जाव केलाय. दरम्यान, येथे तरूण-तरूणी येऊन अश्लील चाळे करतात. त्यामुळे नागरिकांनी हा निर्णय घेतला.
    मुंबईतही ठिकठिकाणी असे झोन आपल्याला पाहायला मिळतील. हा झोन आहे नो किसिंग झोन. मुंबईतील बोरिवली पश्चिम येथे असलेल्या जॉगर्स पार्कजवळ हा झोन नागरिकांनीच घोषित केला आहे.

    हा प्रयोग काहीअंशी यशस्वी झाला आहे. नागरिकांकडून असं लिहिल्याचा परिणाम देखील झाला आहे. याचा परिणाम म्हणून आता जॉगर्स पार्कजवळील ठिकाणी कमी जोडपी दिसत आहेत, असं येथील रहिवासी सांगत आहेत.

    तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

    वाचा काय झाले सविस्तर, बोरिवली पश्चिम येथे असलेल्या जॉगर्स पार्कजवळ तरुण जोडपी भर रस्त्यात अश्लील कृत्य चाळे करत आहेत. यामुळे या विभागात राहणारे नागरिक त्रस्त झाले. अश्या जोडप्यांना आळा घालण्यासाठी रस्त्यावरच ‘नो किसिंग झोन’ अस लिहिलं आहे. बोरिवलीच्या चिकुवाडीतील ‘सत्यम शिवम सुंदरम’ सोसायटी आहे. याच सोसायटीजवळ जोगर्स पार्क आहे.

    या ठिकाणी नागरिक व्यायाम करायला तसेच फिरण्यासाठी जात असतात. कोविड काळात अनेक ठिकाणी जमावबंदीचा हुकूम असल्यामुळे या ठिकाणी तरुण जोडपी दुचाकी किंवा कारमध्ये येऊन अश्लील चाळे करत असतात. हे एक हाय प्रोफाईल क्षेत्र आहे आणि या हाय प्रोफाईल क्षेत्राच्या मध्यभागी एक गार्डन तयार करण्यात आलं आहे. या ठिकाणी जोडपी अश्लील कृत्य करताना नेहमीच दिसून येतात. अशा जोडप्यांना पायबंद घालण्यासाठी रहिवाश्यांनी नवा मार्ग स्वीकारला आणि सोसायटीच्या बाहेरच्या रस्त्यावर ‘NO KISSING ZONE’ असं लिहिलं आहे.

  • आलुरे गुरुजींचे निधन : आदर्श नितीमुल्याचं सह्याद्री म्हणजे आलुरे गुरूजी

    आलुरे गुरुजींचे निधन : आदर्श नितीमुल्याचं सह्याद्री म्हणजे आलुरे गुरूजी

    एखाद्याकडे आर्दश नितीमुल्य आसतात तरी किती ? तर काही ठराविक क्षेत्रातच आर्दश मुल्य असतात .पण ज्यांच्या कडे ठाई ठाई आर्दश नितीमुल्य सह्याद्री एवढे भरलेले आहेत अस व्यक्तीमत्व म्हणजे सि ना आलुरे गुरूजी ( बाबा ) आई वडिलांनी ,गुरूजनानी , थोरामोठ्यानी घालून दिलेली आर्दश शिकवण अंगीकारत आचरण करत चालत राहणे हा बाबांचा स्वभाव त्यामुळे त्याचा संग्रह होत होत ते आर्दशमुल्य सह्याद्री एवढे झालेत .कुंटूब ,समाज , शैक्षणिक क्षेत्र, राजकारण ,सहकार आशा अनेक क्षेत्रातील नितीमुल्याच दुसर नाव म्हणजे आलुरे गुरूजी .

     

    आज महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी यांना मी आलुरे गुरूजी यांच्या जवाहर विद्यालय चा विद्यार्थी आहे याचा अभिमान वाटतो .आशा जवाहर विद्यालय ला गुरूजी नी घडवल ,वाढवल ,रूळवल त्याच्यावर एक एक संस्कारच नितिमुल्याच आभूष घातल म्हणून ते आज समाजच भूषण आहे . तस पाहिल तर आणदूर हे गाव खेडेगावच. एक जवाहर विद्यालय सोडल तर इतर कुठल्याही सुविधा नाहीत .पण सोलापूर ,उस्मानाबाद ,लातूर जिल्ह्यातीलच नव्हे तर या शहरातील शेकडो विद्यार्थी जवाहर विद्यालयाच्या वस्तीगृहात अथवा स्वतंत्र खोलीकरून राहत आसत.90 च्या दशाका पर्यत तर तुळजापूर तालुक्यातील 60 % विद्यार्थी हे जवाहर विद्यालयचे विद्यार्थी आसत . शाळेचा गणवेश हा डोक्यावर गांधी टोपी पांढरा शर्ट खाकी हाफ पँन्ट हा ड्रेस विद्यार्थीची एक ओळख होती शाळेच्या वेळेत सोलापूर ते उमारगा या रोडवरील जेवढ्या एस टी धावत त्या विद्यार्थीनी खचा खच भरून वाहत पाय ठेवण्यासाठी सुध्दा जागा नसत .आणि मी पण याच महाविद्यालयचा विद्यार्थी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे .

    शाळेतील गुरूजन वर्ग हा आजही आई वडिला एवढा प्रिय आहे .शाळेतील शिस्त संस्कार ,आपलेपणा , आपुलकी , प्रेम हे गुरूकुला एवढच म्हटलं पाहिजे कारण या गुरूकुलाचे कुलगुरू आचार्य आलुरेगुरूजी होते त्यांनी एक एक अंत्यत गरजू हुशार संस्कारक्षम शिक्षकांचीच नियुक्ती केली होती.आणि त्यावर गुरूजीच संपूर्ण बारीक लक्ष आसत ते 1980 च्या कालखंडात आमदार होते त्या वेळी सुध्दा आणदूर येथे असले तर सकाळीच विद्यालयात प्रार्थना साठो येत .शाळेत स्वच्छता झालीय की नाही पाहत अनेक वर्गावर जात विद्यार्थीशी हितगुज करीत .वस्तीगृहात जात तेथील व्यवस्था पाहत शाळेच्या कुठल्या व्यवस्थेत ते सहभागी होत .म्हणूनच विद्यार्थीनां त्यांचा विद्यार्थी आसल्याचा अभिमान वाटतो.

    तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

    त्यांनी घडविलेली कै ब्याळे गुरूजी नी व नरे गुरूजी ,कुंभार गुरूजी ,नाना कुलकर्णी , मुळे गुरूजी ,खोबरे गुरूजी ,कांबळे गुरूजी ,बिच्चे ,पाटील ,कबाडे गुरूजी हे सगळे उदाहरण दाखल आहेत आसे किती तरी गुरूजी ने समाजात लाखो विद्यार्थी ताट मानाने जगणारे विद्यार्थी घडविले.साने गुरूजीच्या विचाराचे संस्कार विद्यार्थीवर केले.हे सर्व करण्याचा नैतिक आधिकार आलुरे गुरूजी नी मिळविलेला होता म्हणून शक्य झाले का तर शाळेचा ,शिक्षणाचा बाजार त्यांनी मांडला नाही. होवू दिला नाही नव्हे तर अंत्यत गरीब कुंटूबातील पात्र लोकांना त्यांनी त्यांच्या कडे घरी जावून बोलावून घेऊन संस्थेत नोकरी लावली आशा शकडो कर्मचारी चे बाबा जगण्याचा श्वास आहेत .
    राजकारणात बाबा नी तुळजापूर तालुक्याच आमदार म्हणून एक वेळ काम केलेले आहे त्या ही वेळी बाबांनी अनेक सार्वजनिक कामे केलीत.महाराष्ट्र विधानसभेत त्यांच्या वागण्याचा एक ठसा त्यांनी उमटवला होता,ज्यां खेळ्या जमत नाही त्यांचा टिकाव राजकारणात लागत नाही .बाबांना राजकीय खेळ्या कधी जमल्या नाहीत म्हणून मैदानी राजकारणात त्यांना फारस र्स्वास नव्हते ते जनतेच्या गोरगरिबाच्या मनात त्यांना स्थान होते . आजही तुळजापूर तालुक्यात आलुरे परिवार आशा आहे की त्यांना “कारण आणि मरण ” याची खबर मिळाली की ते त्या कार्यक्रमला हजर राहतातच .बाबा अणदूर मध्ये असले की परवा परवा पर्यत या कारणाला जात होते. तब्यतीमुळे जाणे शक्य होत नव्हते तरी ते घरातून कुणालातरी पाठवतच आसत.

     

    जवाहर विद्यालयाच्या व स्वताच्या नावावर बाबा काही ही करू शकले असते शैक्षणिक क्षेत्रातील साम्राज्य उभा करू शकले आसते मात्र ते साने गुरूजी च्या विचाराचे नव्हे तर आचाराचे पाईक होते .
    त्यांनी तुळजाभवानी साखर कारखाना ,लातूर सिध्देश्वर बँक चेअरमन , राज्यशिखर बँक चे पदाधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली आहे .कुठेही त्याचा त्यांनी अवडंबर केल नाही त्यांच्या सात्विकपणाची छापच त्यांनी या संस्थावर पाडली आहे. ते आमच्या कुंटूबाचे मार्गदर्शकच होते सुखा दुखाच्या कार्यक्रमात बाबा यायचे येणेगुर मार्गी कुठे जात आसतील वेळे प्रमाणे शक्य असेल तर अनेक वेळा ते घरी यायचे एखाद्याच सन्मान ते आशा पध्दतीने करीत .माझ्या मनात तर बाबा बदल लहानपणी पासूनच आत्मीयता होती परत मी जवाहर विद्यालय चा विद्यार्थी म्हणून अभिमान आहेच आस हे आत्मीक अभिमान निर्माण करणार संस्काराच विद्यापीठ होत. त्यांच्या कुंटूबातील रामदादा यांच माझ्यावर सतत लक्ष आसत मार्गदर्शन आसत
    अनेक वेळा घरगुती , सार्वजनिक कार्यक्रमात प पू सदगुरू गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या समवेत जाण्याचा योग आला बाबांची प पू गहिनीनाथ महाराज यांच्या वर श्रद्धा होती बाबा वाकून नमस्कार करते वेळी महाराज त्यांना म्हणायचे आसू द्या हो पण बाबा म्हणायचे “आपण धर्मपीठाचे आधिकारी आहात आपल्या जवळील विद्ववते मुळे जनतेच कल्याण होते मग आशा व्यक्ती समोर मी नतमस्तक होणारच ” महाराज सोबत ते खूप चर्चा करत.बाबा म्हणजे ” जेथे कर माझी जुळती जेथे दिवा ना पणती ” आसे होते दिवातील वात होवून समाजाला प्रकाश देणार हे दिव्य दिवा आज कायम स्वरूपी शांत झाल लाखो विद्यार्थीचे या पिढीतील साने गुरूजी लोप पावले आशा या महान विभूती च्या चरणी नतमस्तक व भावपूर्ण श्रद्धाजंली

    – मेघराज बरबडे, लातूर

  • माजी आमदार, शिक्षण महर्षी सि.ना.आलुरे गुरूजी यांचे पहाटे निधन

    माजी आमदार, शिक्षण महर्षी सि.ना.आलुरे गुरूजी यांचे पहाटे निधन

    उस्मानाबाद : तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार आणि शिक्षण महर्षी सि.ना.आलुरे गुरूजी (वय 90)यांचं आज सोमवारी (ता. 2 अॉगस्ट) पहाटे दीर्घ आजारानं निधन झालं. 1980 साली ते काँग्रेसचे तुळजापूरचे आमदार होते. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 3 नंतर अणदूर या गावी अंत्यसंस्कार होणार असल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले. मराठवाड्याचे साने गुरुजी अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने पूर्ण मराठावाडा शोक व्यक्त करत आहे.

    6 सप्टेंबर 1932 रोजी आलुरे गुरुजी यांचा जन्म झाला होता. बीडच्या पाटोदा तालुक्यात त्यांनी सुरुवातीला शिक्षक म्हणून काम सुरु केले. त्यानंतर ते अणदूरच्या जवाहर विद्यालयात रुजू होऊन तिथूनच ते मुख्याध्यापक म्हणून 1990 साली निवृत्त झाले. शिक्षण प्रसारक मंडळामार्फत आलुरे गुरुजी यांनी अणदूर व त्याच्या ग्रामीण परिसरात विविध गावांत 28 शाळा सुरु केल्या आहेत.

    शिक्षकाची नोकरी लागल्यापासून 25 टक्के पगार ते गरीब व मागासवर्गीय मुलांच्या शिक्षणासाठी देत. शिक्षक व आमदार म्हणून मिळणाऱ्या पेन्शनची रक्कमही त्यांनी दलित मुलांसाठीच दिली. मागासवर्गीय आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी त्यांनी वसतीगृहे सुरु करुन शिक्षण उपलब्ध करुन दिले.

    तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

    तुळजाभवानी साखर कारखान्याचे ते माजी अध्यक्षही होते. महात्मा गांधी, साने गुरुजी, विनोबा भावे यांच्या विचाराने ते प्रभावीत होते. मराठवाड्याचे साने गुरुजी अशीही त्यांची ओळख होती. व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मुलन, सहकार क्षेत्रातही त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे. बाबा आमटे यांच्या ‘भारत जोडो’ अभियानात ते सहभागी होते. तुळजापूरला अभियांत्रिक कॉलेज उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. काँग्रेसचे निष्ठावान नेते म्हणून त्यांची ओळख होती.

    शिवराज पाटील चाकूरकर, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, मधुकर चव्हाण यांच्यासोबत त्यांचे राजकीय काम सुरु होते. शासनाच्या अनेक समित्यांवरही त्यांच्या नियुक्त्या होत होत्या. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते त्यांचा मोठा गौरवही झाला होता. मराठवाड्यातला दुष्काळ असो वा राष्ट्रीय आपत्ती असो आलुरे गुरुजी आणि त्यांच्या शाळेची आपदग्रस्तांना नेहमी मदत करत असे. त्यांच्या निधनाने पूर्ण मराठावाडा शोक करत आहे.