सोलापूर : कन्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या मंत्रिपदाला अडथळा ठारु नये म्हणून ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनीच अक्कलकोटचे सिध्दाराम म्हेत्रे यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत केले, असा गंभीर आरोप माजी मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे नेते लक्ष्मण ढोबळे यांनी सोलापुरात एका मंचावर केला होता. यावर आता सुशीलकुमार शिंदेंसह काँग्रेस नेत्यांनी ढोबळेंवर टीकेची झोड उठवली आहे. वाचा कोण काय म्हणाले.
आपला विरोधातील उमेदवार कोण असावा, हेही सुशीलकुमार शिंदे हेच ठरवत होते. आपल्या मुलीच्या मंत्रीपदाला अडथळा होऊ नये; म्हणून त्यांनी सिद्धाराम म्हेत्रे यांनाही निवडणुकीत पराभूत केले. तसेच, ताई तुम्ही एकदा शहर मध्य सोडून शहर उत्तरमध्ये निवडणूक लढवा. एकदा होऊन जाऊद्या, असे आव्हानही ढोबळे यांनी आमदार प्रणिती शिंदे यांना दिले होते. ढोबळेंनी हा मुद्दा का उपस्थित केला माहीत नाही, पण आता यावर काँग्रेस नेते आक्रमक झाले आहेत.
प्रतिउत्तर देताना माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नामोल्लेख टाळत ढोबळेंच्या टीकेकडे दुर्लक्ष करण्याचाच सल्ला दिला. लक्ष्मण ढोबळे यांची ताकद भाजपला माहिती आहे. त्यामुळे त्यांना पक्षात कोणीच काही किंमत देत नाहीत. त्यातूनच ते वारंवार अशा प्रकारची वक्तव्ये करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी अशी बेताल वक्तव्य करण्यापेक्षा विकासकामांवर बोलावे आणि त्यांनी सोलापूर शहरात ढवळाढवळ करण्यापेक्षा त्यांच्या मतदारसंघाकडे लक्ष द्यावे, असा सल्ला काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी दिला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांना मुलाप्रमाणे मानतात. ज्या पक्षाने लक्ष्मण ढोबळेंना मोठे केले, त्या पक्षाला सोडून पक्षांतर करणाऱ्या ढोबळेंना लोक चांगलेच ओळखून आहेत. त्यामुळेच त्यांनी त्यांचा मतदारसंघ सोडून शहराकडे लक्ष द्यायला सुरवात केली आहे. चापुलसगिरी करणाऱ्या ढोबळेंना हे बोलणे शोभत नाही, असा काँग्रेसचे सोलापूर शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी समाचार घेतला आहे.
निवडणुकीनंतर लक्ष्मण ढोबळेंनी आताच हे वक्तव्य का केले, हा संशोधनाचा भाग आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी कधीच कोणाबद्दल द्वेष ठेवला नाही. शहराच्या विकासात त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्यामुळेच शहराच्या पिण्याच्या पाण्याची दुहेरी पाईपलाईन होत असल्याचे ढोबळेंनी विसरू नये, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक ऍड. यु. एन. बेरिया यांची आठवण करुन दिली.
सोलापूर स्मार्ट सिटीत येण्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांचे योगदान सोलापूकरांना माहिती आहे. काँग्रेसने पहिलीच बैठक शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात घेतली. त्यामुळे भाजप नेत्यांच्या पायाखालील वाळू सरकरली आहे. कोणाची तरी मर्जी राखण्यासाठी लक्ष्मण ढोबळे यांनी हे वक्तव्य केले आहे, असा टोला माजी महापौर संजय हेमगड्डी यांनी लगावला.