मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणा-या बारावीच्या निकालाची मोठी उत्सुकता विद्यार्थ्यांसह पालकांना लागली होती. 31 जुलैपर्यंत हा निकाल जाहीर होणार असं सांगण्यात येत होत. मात्र, आता उद्या मंगळवारी (3 ऑगस्ट) दुपारी 4 वाजता हा निकाल जाहीर होणार असल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवरुन सांगितलं आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या निकालाचीही उत्सुकता वाढली आहे. बारावीच्या निकालापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून विद्यार्थ्यांचे परीक्षा क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. विद्यार्थी http://mh-hsc.ac.in या वेबसाईटवर भेट देऊन त्यांचा बैठक क्रमांक मिळवू शकतात.
2 जुलै 2021 रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार सन 2021 मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) परीक्षेस श्रेणीसुधार योजनेतंर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आलेला नाही. सदर विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधीमध्ये या परीक्षेची गणना करण्यात येणार नाही. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांना पुढील एक /दोन संधी उपलब्ध राहतील.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोरोनामुळे यावर्षी राज्य मंडळाच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. दहावी, अकरावी व बारावीच्या अंतर्गत गुणमापन पध्दतीनुसार यावर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मुल्यमापन व मुल्याकंन एका वेगळ्या धर्तीवर केले होते व त्यानुसार गुणांकन करण्यात आले आहे. अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय प्राप्त गुण तसेच इ.12 वी चे अंतिम तोंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत व तत्सम मूल्यमापनातील प्राप्त गुण या नुसार निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षा सन 2021 साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण जाहीर केलेल्या संकेतस्थळांवर पाहता येतील. तसेच माहितीची प्रतही घेता येईल.
बारावीची परीक्षा रद्द झाल्यामुळे राज्य मंडळातर्फे अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर केला जात आहे. राज्य मंडळाच्या सूचनेनुसार शाळांनी संगणकीय प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांचे गुण जमा केले आहेत. आता विभागीय मंडळाकडून प्राप्त गुणांचे संकलन राज्य मंडळकडून केले जात आहे. बारावीच्या निकालांबाबत अनेक अफवा पसरल्या होत्या. मात्र, आता निकालाची तारीख निश्चित झाली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2021 मध्ये मंडळाच्या कार्यपद्धती नुसार तयार करण्यात आलेला इ.12 वीचा निकाल 3 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे. स्वत: शिक्षणमंत्र्यांनी ट्विट करुन याची घोषणा केली आहे.
इथे पाहा निकाल