सोलापूर : गोंधळी समाजातील शरणीदास भोसले यास तीन वर्षा पासून समाजातून वाळीत टाकून त्याचे प्रकरण मिटवण्यासाठी दोन लाखाची मागणी केल्याप्रकरणी 4 पंचांना अटक करण्यात आल्याची माहिती एमआयडीसी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पवार यांनी दिली.
मागील जुन्या काळातील चुकीच्या रूढी परंपरा नष्ट व्हाव्यात, माणसाला माणूस म्हणून वागणूक मिळावी, यासाठी शासनाने अनेक कायदे केले परंतु याची खरंच अंमलबजावणी झाली आहे का…होतं आहे का ? हा प्रश्न अनेक वेळेस पडतो. मात्र अशीच एक घटना सोलापूर शहरात घडली आहे. पोलिसांनी मनावर घेतलं तर अशा गोष्टींना चांगलाच आळा बसू शकतो. हे सोलापुरात समोर आलं आहे.
जातपंचायतीचे प्रकार सर्रास उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश मध्ये पाहायला मिळतात. त्यासंदर्भात गुन्हे देखील दाखल होतात. परंतु सोलापुरात देखील गोंधळी समाजामध्ये असाच प्रकार घडला आहे. सांगली येथे राहणाऱ्या शरणीदास पांडुरंग भोसले याचे आपल्या पत्नीबरोबर मागील चार वर्षांपूर्वी घरगुती कारणावरून भांडणे झाली होती हा वाद सोलापुरातील गोंधळी वस्तीतील गोंधळी समाज पंचांच्या पंचायत समोर मांडण्यात आला.
यावेळी पंचांनी योग्य तो न्याय न करता शरणीदास भोसले याच्यावर अन्याय केल्याची तक्रार भोसले यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यासह हे प्रकरण मिटवतो आणि तुझ्या पत्नीस नांदावयास पाठवतो, आम्हाला दोन लाख रुपये दे , अशी मागणी गोंधळी समाजाचे पंच राम धोडिंबा शिंदेपाटील, अशोक शिंदेपाटील, नाना शिंदेपाटील, संतोष राम शिंदे, उत्तम शिदे, यांनी केल्याची तक्रार ही भोसले यांनी दिली आहे. या घटनेची हकीकत शरणीदास भोसले यांनी पोलिसांना सांगितली.
आरोपी हे गोंधळे समाज पंच कमिटीचे पंच आहेत. यातील नमूद आरोपींनी फिर्यादीचे काहीही न ऐकता फिर्यादीला व फिर्यादीच्या मुलांना जातीच्या बाहेर काढले. त्यामुळे फिर्यादीने त्यांना आमच्यावर अन्याय का करता, असे विचारले असता आरोपी पंच राम धोडिंबा शिंदेपाटील याने फिर्यादीस दोन लाख रुपये दे, तुझी पत्नी नांदायला पाठवतो असे म्हणून फिर्यादीस त्यांच्या समाजामधून बहिष्कृत केले. त्यामुळे फिर्यादीची समाजात व राहते परिसरात मानहानी झाली आहे. या संबंधी 4 आरोपी अटक केले आहेत. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पवार यांनी दिली.
या घटनेचा पुढील तपास एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलीस सब इन्स्पेक्टर माळी हे करीत आहेत. एकीकडे लोक एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत आहेत. जगात अनेक ग्रहांचा शोध सुरू आहे. तर सोलापूर शहरात मात्र आजही जातपंचायतीच्या त्रासामुळे अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने वेळीच लक्ष घालून अशा चुकीच्या रूढी-परंपरांना आळा घालणे गरजेचे आहे तरच सामाजिक स्वास्थ्य चांगले राहण्यास मदत होणार आहे. परिणामी प्रत्येकाचा विकास होण्यास हातभार लागणार आहे.