लातूर : दोन अज्ञात तरुणांनी एका 35 वर्षीय तरुणाचा चाकू, कत्तीने वार करून निर्घृण खून केल्याची घटना आज मंगळवारी दुपारी घडली. दिवसा ढवळ्या घडलेल्या या घटनेने लातूर शहरात खळबळ उडाली आहे.
या बाबतची अधिक माहिती अशी की, शहरातील दादोजी कोंडदेव नगरमध्ये राहणारा गोकुळ मंत्री हा 35 वर्षीय तरुण आपल्या दुचाकीवरून घराबाहेर पडला होता. तो सद्गुरू नगरमधील राधा कृष्ण मंदिरच्या मागे आला असताना दोघा अज्ञात तरुणांनी त्याच्यावर कत्ती आणि चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात गोकुळ जबर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.
गोकूळ मंत्री असे या खून झालेल्या युवकाचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी पंचनामा करून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आज मंगळवारी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास दादोजी कोंडदेवनगरात राहणारा गोकूळ मंत्री नामक ३५ वर्षीय इसम आपल्या दुचाकीवरून घराबाहेर पडला होता. त्यासोबत दोन तरूण त्याच्या दुचाकीवर बसून जात होते.
त्याच तरूणांनी सदगुरू नगरात आल्यानंतर राधाकृष्ण मंदिराच्या मागील वस्तीतील रस्त्यावर गोकूळ मंत्री याच्या शरीरावर, डोक्यात, पाठीत चाकू व कत्तीने सपासप वार करून निर्घृणपणे खून केला आणि मारेकर्यांनी तेथून पळ काढला, अशी चर्चा प्रत्यक्षदर्शी भित भीत चर्चा करीत होते.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस ताफ्यासह घटनास्थळी हजर होऊन पंचनामा केला असून मयताचे प्रेत शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवून देण्यात आले आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुुरु आहे.