मुंबई : सैराट चित्रपटामुळे स्टार झालेली आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरुमध्ये आता मोठा बदल झाला आहे. आर्चीने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. त्यावरून तिच्यात झालेला बदल दिसून येतो. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने या बदलाविषयी प्रतिक्रिया दिली आहे. वेगळे दिसण्यासाठी आपल्याला स्वतःवर काम करावंच लागते, काही गोष्टी सहज बदलतात, असे रिंकूने म्हटले आहे. आर्ची आता हिंदी चित्रपटात झळकणार आहे.
रिंकू राजगुरू ही मराठी सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘सैराट’ या सुपरहिट चित्रपटातून तिला लोकप्रियता मिळाली. आर्ची अर्थात रिंकू राजगुरू सोशल मीडियावरही सक्रिय असते. ऑनलाईन पोस्ट, फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. यावेळी देखील ती अशाच एका ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत आहे. या फोटोमधील तिचं सौंदर्य पाहून चाहते सैराट झाले आहेत.
रिंकू लवकरच ‘२०० हल्ला हो’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात दलित महिलांवर झालेल्या अत्याचारावर भाष्य करण्यात येणार आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटात रिंकू राजगुरुसोबत अमोल पालेकर आणि बरुण सोबती मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सार्थक दासगुप्ता यांनी केले आहे. हा चित्रपट २० ऑगस्ट रोजी झी ५ या अॅपवर प्रदर्शित होणार आहे.
२९ एप्रिल २०१६ रोजी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा ‘सैराट’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने अख्या महाराष्ट्राला याड लावले. या चित्रपटातले प्रत्येक गाणे आणि संवाद सुपरहिट ठरले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आर्चीची भूमिका साकारणीरी रिंकू राजगुरू ही कायमच चर्चेत असते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये रिंकूने सैराट हिट ठरल्यानंतर अनेक चित्रपटांच्या ऑफर का नाकारल्या या मागचे कारण सांगितले आहेत.
रिंकूने नुकतीच ‘झूम’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ती म्हणाली, ‘सैराट चित्रपटाच्या यशानंतर मला अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या. पण अनेकांना सैराट सारखेच चित्रपट करायचे होते कारण सैराट हिट ठरला होता. सैराटमध्ये मी जी भूमिका साकारली त्याच प्रकारच्या भूमिकांच्या ऑफर मला येत होत्या. पण मला तशीच भूमिका परत साकारायची नव्हती. मला काही तरी वेगळे करायचे होते. त्यामुळे सैराटनंतर मी अनेक चित्रपटांना नकार दिला’ असे म्हटले.
पुढे तिला सैराट इतर भाषांमध्ये करण्याबाबत विचारण्यात आले. तेव्हा ती म्हणाली, ‘मी याविषयी काही बोलू शकत नाही. लोकांना करायचा असेल तर ते करु शकतात. कारण ते त्यांचे काम आहे. पण माझ्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे. कारण मराठी चित्रपटांचा रिमेक हिंदीमध्ये होत नाही. उलट हिंदी चित्रपटांचे रिमेक मराठीमध्ये केले जातात. हा पहिला चित्रपट आहे ज्याचा हिंदीमध्ये रिमेक करण्यात आला.’