सोलापूर : वेगाने जाताना दुचाकीवरून घसरल्याने तरुण गंभीर जखमी होऊन मरण पावला. हा अपघात सोमवारी (ता. ९) सकाळी चिंचोळी एमआयडीसी येथे घडला. वाचा सोलापूर शहरातील गुन्हेगारी बातम्या.
रोहित रामा पैकेकर (वय२०रा. बीबीदारफळ ता.उत्तर सोलापूर) असे मयताचे नाव आहे. तो काल सकाळी दुचाकीवरून जात होता. चिंचोळी एमआयडीसी जवळ दुचाकीवरून घसरल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तो आज मंगळवारी दुपारी मरण पावला.या अपघाताची नोंद तालुका पोलिसात झाली आहे.
सोलापूर – विजापूर रोड वरील छत्रपती संभाजी तलावात एका ३७ वर्षीय विवाहित महिलेने उडी टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना काल मंगळवारी (ता.१०) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. हा प्रकार घडल्यानंतर रिक्षाचालक बबलू नदाफ आणि इतर सहकाऱ्यांनी त्याला पाण्याच्या बाहेर काढून शासकीय रुग्णालयात बेशुद्धावस्थेत दाखल केले. ही महिला रेल्वे लाईन परिसरातील असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. या घटनेची नोंद सदर बजार पोलिसात झाली आहे.
* फाशी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न
बीबीदारफळ (ता.उत्तर सोलापूर) येथे राहणाऱ्या यश किरण निंबाळकर (वय२१) या तरूणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. आज मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास त्याने घरातील छताच्या लोखंडी पाइपला केबलच्या सहाय्याने गळफास घेतला होता. त्याला फासातुन सोडवून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मानसिक तणावातून त्याने हा प्रकार केल्याची नोंद तालुका पोलिसात झाली आहे .
* अलकुंटे चौकात चाकूने वार तरुण जखमी
उत्तर सदरबझार परिसरातील अलकुंटे चौकात भांडण सोडविण्यास गेल्यानंतर चाकूने केलेल्या मारहाणीत श्रीशैल मल्लेश बंटू (वय ३०रा.अलकुंटे चौक) हा तरुण जखमी झाला. ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उमेश म्हेत्रे आणि राहुल या दोघांनी मारहाण केल्याची नोंद सदर बाजार पोलिसात झाली आहे.
* आंतरजिल्हा टोळीला अटक; चोरीच्या १० मोटारसायकली जप्त
सोलापूर – सोलापूर शहर परिसरातून ६ तर लातूर जिल्हा परिसरातून ४ अशा एकूण १० मोटरसायकली चोरणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील चौघांना जोडभावीपेठच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून ३ लाख रुपये किमतीच्या दहा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. सर्व आरोपी औसा (जि. लातूर) परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अमित मधुकर थोरात (वय२५),पांडुरंग हनुमंत पांचाळ (वय२३),मनोज विजयकुमार राठोड (वय२३) आणि बालाजी श्रीमंत लोंढे (वय२१ सर्व रा. औसा जि. लातूर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. या सर्वांनी मिळून सोलापूर शहर परिसरातून ६ तर लातूर परिसरातून ४ मोटारसायकली चोरल्याचे निष्पन्न झाले. पोलीसांनी आणि सर्व वाहने जप्त केले.
रुपाभवानी मंदिराचा समोरून चार दिवसापूर्वी मोहन जाधव यांची दुचाकी चोरीस गेली होती. या प्रकरणात त्यांनी जोडभावीपेठ पोलिसात फिर्याद नोंदवली होती. घटनेच्या दुसऱ्या दिवशी जुना तुळजापूर नाका येथे पोलीसांनी अमीत थोरात आणि पांडुरंग पांचाळ या दोघांना संशयावरून अटक केली. तेव्हा त्यांच्याजवळ आढळलेली दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी आणखी दोघांना अटक करून एकूण १० दुचाकी जप्त केले .
पोलीस निरीक्षक भालचीम, राजेंद्र करणकोट यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे फौजदार दाईंगडे, हवालदार थोरात, नंदकुमार गायकवाड, सुरेश जमादार, योगेश बर्डे, बापू साठे, अय्याज बागलकोटे, प्रकाश गायकवाड, अतुल गवळी, सैपन सय्यद, अविनाश राठोड, अमित पवार, गोपाळ शेळके, निलेश घोगरे, सुहास गायकवाड आणि यशसिंह नागटिळक आदींनी ही कामगिरी केली.