पंढरपूर : पंढरपूरसह पाच तालुक्यात लावण्यात आलेल्या संचारबंदी विरोधात पंढरपुरातील वातावरण संतप्त असताना आज संचारबंदीच्या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी आ. प्रशांत परिचारक व आ. समाधान आवताडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.
आ. परिचारक यांनी पंढरपुरात लावण्यात आलेली संचारबंदी ही व्यापारी व जनतेवर अन्याय करणारी असून याआधी वर्षातील सर्व यात्रांवर बंदी घालल्याने पंढरपूरची अर्थव्यवस्था उध्दवस्त झालेली आहे. आषाढी यात्रेत लावलेल्या संचारबंदी व सर्व नियमांचे पालन करीत जनता व व्यापारी यांनी प्रशासनास सहकार्य केले आहे.
आता पंढरपूर शहरातील कोरोना संक्रमण नग्यण असून ग्रामीण भागात वाढणार्या रुग्णांमुळे पंढरपुरला निर्बधांचा त्रास सहन करावा लागत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तरी सर्व जनता व व्यापारी यांचा विचार करुन आपण संचारबंदीच्या निर्णयाबाबत फेरविचार करावा, जसे पुणे शहर व ग्रामीण अशी विभागणी करुन पुणे शहराला निर्बधातून सुट दिली आहे तशीच सुट पंढरपूरला मिळावी अशी मागणी आ. परिचारक यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली.
याबाबत व्यापारी व जनतेचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर हे पंढरपुरात येणार असून ते सर्व व्यापार्यांसोबत बैठक घेतील व त्यामध्ये या निर्णयाबाबत विचार करण्यात येईल असे सांगण्यात आले. आ.प्रशांत परिचारक व आमदार समाधान आवताडे यांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही भेटले व त्यांना या प्रश्नात लक्ष घालण्याची विनंती केली. या प्रसंगी आ. रणजितसिंह मोहिते पाटील हे सुध्दा उपस्थित होते.
अत्यंत गडबडीत असतानाही आमदार परिचारक यांच्या विनंतीला मान देऊन मुख्यमंत्र्यांनी या बाबत आ. परिचारक व आ.आवताडे यांच्याशी चर्चा केली. आ. प्रशांत परिचारक यांनी पंढरपुरात लावण्यात आलेल्या संचारबंदी उठविण्याबाबत थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने संचारबंदीबाबत तोडगा निघण्याची आशा निर्माण झाली आहे.