सोलापूर : महानगरपालिकेच्या वतीने ‘माझी वसुंधरा अभियाना’अंतर्गत एक लाख वृक्ष लागवड मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वादाला तोंड फुटले आहे. गटनेता आनंद चंदनशिवे यांनी कार्यक्रमादरम्यान भरणेंना मुख्यमंत्री होण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. या कार्यक्रमात आनंद चंदनशिवे यांनी पालकमंत्र्यांचे भरभरून कौतुक केले.
यावेळी चंदनशिवे यांनी त्यांना मुख्यमंत्री व्हा असे म्हणत त्यांचं कौतुक केले. त्यानंतर पालकमंत्री भरणे यांनी चंदनशिवे यांना ‘दादा मला खूप काही मिळाले आहे. तुम्हाला काय द्यायचं आशीर्वाद तो माझ्या अजितदादांना द्या, असे म्हणत महापौरांशी वाढीव निधी देण्याबाबत बोलताना थेट मुख्यमंत्री मरू द्या, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. नेमके काय घडले होते, पुढे वाचा.
मात्र आता या वक्तव्यामुळे शिवसेनेचे सोलापूर शहर संपर्कप्रमुख आणि नगरसेवक गुरूशांत उत्तरगावकर यांच्यासह इतर नेत्यांनी सज्जड दमच दिला आहे. याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हिडिओत बोलताना त्यांची जीभ घरसली असेल मात्र त्यांनी चूक मान्य करून दिलगिरी व्यक्त करावी. उद्धवसाहेब मुख्यमंत्रीनंतर पण शिवसेना पक्षप्रमुख आणि बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहेत. त्यामुळे जर तुम्ही दिलगिरी व्यक्त केली नाही आणि तशीच खुमखुमी तुम्हाला असेल तर ज्या जिभेने तुम्ही हे बोलला आहात ती जीभ हासडून हातात दिल्याशिवाय शांत बसणार नाही,’ असा इशारा धुत्तरगावकर यांनी दिला आहे.
एका कामाला निधी उपलब्ध करुन देण्यासंदर्भात ‘मरुद्या मुख्यमंत्री’ असं वक्तव्य केलं. दत्तात्रय भरणे यांच्या वक्तव्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. तुम्ही तुमच्या औकातीत राहून शब्द वापरा. आमच्या शिवबंधनाची ताकद पाहायची असेल तर आम्ही एका क्षणात दाखवू, असे खडे बोल सोलापूर व उस्मानाबाद शिवसेना संपर्क प्रमुख आमदार तानाजी सावंत यांनी भरणे यांना सुनावले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदेश आहे, महाविकास आघाडीला तडा जाईल असं कोणतंही वक्तव्य करायचं नाही. या एका बंधनामध्ये राहून आम्ही मान घालून गप्प बसलो आहोत. याचा अर्थ तुम्ही आमच्या छाताडावर नाचावं, आमच्या पक्षप्रमुख, राज्याचे मुख्यमंत्री यांच्याविषही अशी गलिच्छ भाषा वापरायची. याचं योग्यवेळी योग्य उत्तर दिलं जाईल, असा इशारा तानाजी सावंत यांनी दिलं आहे.
याबाबत शिवसेना कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. या वक्तव्यामुळे राज्यभरातील शिवसैनिक पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. पालकमंत्र्यांच्या या वक्तव्याचा सोलापूर जिल्हा शिवसेना प्रमुख संभाजी शिंदे यांनीही निषेध व्यक्त केला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमचे दैवत आहेत, त्यांच्या बाबत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काढलेले उद्गार हे निषेधार्ह असून अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना सोलापुरात फिरू देणार नाही, असा इशारा ही पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी दिला आहे.
* पालकमंत्री भरणेंची दिलगिरी
पालकमंत्री एका कार्यक्रमात आपले मनोगत संपवत असताना सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर श्रीकांचना यन्नम त्या ठिकाणी दाखल झाल्या. त्यावेळी पालकमंत्री भरणे यांनी त्यांना निधी उपलब्ध करुन द्यायचा का, असा सवाल केला. तेव्हा महापौर यन्नम यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागुया असे उत्तर दिले. तेव्हा बोलण्याच्या ओघात भरणे यांनी ‘मुख्यमंत्री मरु द्या. आपल्या आपण करु. मुख्यमंत्र्याकडून मोठा निधी मागू’ असे वक्तव्य केले.
यामुळे सोलापुरातील शिवसेनेच्या नेत्यांनी पालकमंत्र्यांवर जोरदार निशाला साधत चोख प्रत्युत्तर दिले. तेव्हा दत्तात्रय भरणे यांनी या बद्दल स्पष्टीकरण दिलं. उद्धव ठाकरे हे आमचे नेते आहेत. मुख्यमंत्री म्हणून त्यांचे खूप चांगले काम आहे. माझ्या वक्तव्याचा पूर्णपणे विपर्यास करण्यात आला. तरी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
या वादावर पडदा टाकताना पालकमंत्री भरणे म्हणाले की, मुख्यमंत्री आमचे नेते आहेत. त्यांच्यावर माझे प्रेम आहे. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. आता भरणे यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर स्थानिक पातळीवर झालेल्या या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे.