काबूल : अफगाणिस्तानच्या काबूल विमानतळावर प्रचंड गर्दी उसळली आहे. तिथे सुरु असलेल्या गोंधळामध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. अफगाणिस्तानच्या हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अत्यंत भयावह स्थिती आहे. विमान पकडण्यासाठी, विमानात प्रवेश मिळवण्यासाठी अक्षरक्ष: चेंगराचेंगरी सुरु आहे. तालिबानच्या हाती सत्ता आल्यामुळे लोकं देश सोडून पळत आहेत.
अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन लष्कर आणि नाटो फौजांनी काढता पाय घेतल्यानंतर हाहाकार उडाला आहे. रक्तपिपासू तालिबान्यांनी महिनाभरात देश काबीज करताना पुन्हा एकदा तालिबानी राजवटीची हाक दिली आहे. देशातील प्रत्येक जीव संकंटात असताना राष्ट्राध्यक्ष अश्रफ गणी यांनी देश सोडल्याने संतापाची लाट उसळली आहे. काबूल विमानतळावर देश सोडून अभूतपूर्व गर्दी झाली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. तालिबानने या ठिकाणी ताबा मिळवल्यानंतर लोक देशातून बाहेर पडण्यासाठी विमानतळावर धाव घेत आहेत. काही जण विमानाच्या टपावर बसलेले दिसून येत आहेत. त्यातच एक व्हिडिओ समोर आला आहे. एका विमानातून काही लोक खाली पडताना दिसत आहेत. त्यामुळे दहशत पसरली आहे. तर विमानतळावर झालेल्या गोळीबारात 5 जणांचा मृत्यू झाला आहे.
हमीद करझाई विमानतळावरुन व्यावसायिक, प्रवासी विमानांची उड्डाणे बंद करण्यात आली आहेत. विमानतळावर लुटमार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती काबूल विमानतळ प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे. अफगाणिस्तानची हवाई हद्द टाळण्यासाठी एअर इंडियाचे शिकागो-दिल्ली विमानाचा मार्ग बदलण्यात आला आहे. मार्ग बदलण्यात आलेल्या दिल्लीला येणाऱ्या या विमानात यूएई किंवा दोहा विमानतळावर इंधन भरण्यात येईल.