सोलापूर : आयुष्यातला पहिला पगार म्हणजे आनंदाची पर्वणी. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात पहिल्या पगाराचे अनोखे महत्व असते. कोणी पहिला पगार आहे तसा जपून ठेवतो, कोणी आपल्या देवाला अर्पण करतो तर कोणी आई, वडील, भाऊ आणि बहिण यांच्यासाठी खरेदी करतो. मात्र नुकतीच संगणक अभियंता बनून टेक महिंद्रा या कंपनीमध्ये नोकरीस लागलेली पूजा सालेगाव हिने तिचा पगार समाजासाठी देऊन समाजासमोर एक अनोखा आदर्श उभा केला आहे.
रविवारी (15 अॉगस्ट) झालेल्या समारंभात पूजाच्या पहिल्या पगारातील 10 हजारांची रक्कम पित्याचे छत्र हरपलेल्या 3 भावंडांना शैक्षणिक शिष्यवृत्ती म्हणून देण्यात आली. पगारातील उर्वरित रक्कमही अशाच सामाजिक उपक्रमासाठी वापरणार आहे.
यावेळी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विस्तार अधिकारी स्वाती स्वामी, इंडियन मेडिकल असोसिएशनचे सचिव डॉ. संजय मंठाळे, सराफ व्यापारी प्रकाश सालेगाव, उत्सव समिती अध्यक्ष सोमेश्वर याबाजी, संगणक अभियंता पूजा सालेगाव उपस्थित होते. भुवनेश्वरी (बी. कॉम. वर्ष 2), नंदिनी (12 वी) आणि गुरुप्रसाद (11 वी) या 4 भावंडांना शिक्षणासाठी 10 हजारांची शैक्षणिक शिष्यवृत्ती मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. त्यांचे वडील इरण्णा अतनुरे यांचे निधन झाले असून आई टोप्या शिवायचे काम करते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तुटपुंज्या उत्पन्नामुळे घरखर्च भागवणे आणि 3 भावंडांना शिक्षण घेणे अशक्य बनले होते. त्यांची हि अडचण निर्मल विद्या मंदिरच्या निर्मला कोंतम यांनी वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांना सांगितली. पूजाने देखील आपल्या मनातील कल्पना व्हिजनचे सोमनाथ चौधरी यांना सांगितली, अशारीतीने दुतर्फा कार्य सिद्धीस पोहोचले.
कार्यक्रमास सीमा सालेगाव, निर्मला अतनुरे, महिला आघाडीच्या सुचित्रा बिराजदार युवक अध्यक्ष विजयकुमार हेले, नागेश बडदाळ, संजय साखरे, आनंद दुलंगे, विजय बिराजदार, राजेश नीला, चिदानंद मुस्तारे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अविनाश हत्तरकी, अमित कलशेट्टी, सचिन विभुते, अमोल कोटगोंडे, सोमनाथ चौधरी, सिद्धेश्वर कोरे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजशेखर बुरकुले यांनी केले. अमृता नकाते हिने सूत्रसंचालन तर आभारप्रदर्शन सोमेश्वर याबाजी यांनी केले.
“माझे आजोबा आणि वडील यांच्या समाजसेवेचा आदर्श माझ्यासमोर होता. प्रत्येकाला समाज काहीतरी देत असतो तेंव्हा आपणही समाजाला दिले पाहिजे या भावनेतून मी माझा पहिला पगार देत आहे. यापुढे प्रतिवर्षी 1 पगार समाजासाठी देण्याचा मानस आहे”
– पूजा सालेगाव
संगणक अभियंता, टेक महिंद्रा, पुणे