वॉशिंग्टन : अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा मिळवला आहे. त्यातच आता अमेरिकन सैन्याच्या उपकरणांचा एक मोठा हिस्सा तालिबानकडे गेला असल्याची माहिती व्हाईट हाऊसनं दिली आहे. याचे काही फोटो, व्हिडीओ समोर आले आहेत. यात तालिबानचे दहशतवादी अमेरिकन शस्त्रास्त्रांचा वापर करताना दिसत आहेत. दरम्यान, ही शस्त्रं अमेरिकेनं अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांना दिली होती. अमेरिकन सैन्याच्या उपकरणांचा एक मोठा हिस्सा तालिबानकडे गेला असल्याची माहिती काल व्हाईट हाऊसनं दिली.
अफगाणिस्तानात वीस वर्षानंतर पुन्हा तालिबानची राजवट आली आहे. अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानमधून माघारी परतल्यानंतर तालिबाननं डोकं वर काढले आहे. अल्पावधीतच तालिबाननं अफगाणिस्तानच्या बऱ्याचशा प्रांतात शिरकाव केला आहे. राजधानी काबुलवर कब्जा करत तालिबाननं संपूर्ण अफगाणिस्तानवरच नियंत्रण मिळवले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आता त्यांच्या हाती अमेरिकेची अनेक अत्याधुनिक उपकरणं लागली आहेत. व्हाईट हाऊसनं याबद्दलची माहिती दिली. गेल्या रविवारीच तालिबाननं विजयाची घोषणा केली आहे. या संदर्भातले काही फोटो, व्हिडीओ समोर आले आहेत. यात तालिबानचे दहशतवादी अमेरिकन शस्त्रास्त्रांचा वापर करताना दिसत आहेत. अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानमध्ये त्यांच्या हातात दिसणारी शस्त्रास्त्रं आता तालिबान्यांच्या हातात दिसू लागली आहेत. ही शस्त्रं अमेरिकेनं अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांना दिली होती. यात यूएस-६० ब्लॅक हॉक आणि कंदहार विमानतळावरील उपकरणांचा समावेश आहे.
संरक्षण साहित्यामधील सर्व उपकरणं कुठे गेली, याबद्दलची संपूर्ण माहिती आमच्याकडे नाही. मात्र त्या सामग्रीचा बराचसा हिस्सा तालिबान्यांच्या हाती गेला आहे, असं व्हाईट हाऊसच्या सुरक्षा सल्लागारांनी सांगितलं. तालिबान्यांचा सामना करण्यासाठी अमेरिकेकडून ब्लॅक हॉक्स अफगाणिस्तान सरकारला देण्यात आले होते. मात्र सरकारनं तालिबान्यांसमोर गुडघे टेकले. सुरक्षा दलांनी शस्त्र, उपकरणं, हेलिकॉप्टर्सवरील नियंत्रण सोडून दिलं. त्यामुळे बरीचशी अत्याधुनिक शस्त्रं आणि उपकरणं तालिबान्यांच्या ताब्यात गेली, अशी माहिती सुरक्षा सल्लागारांनी दिली.