नाशिक : नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. स्वप्निल महारुद्र शिंदे असं मृत डॉक्टरचे नाव आहे. महाविद्यालयातील दोन विद्यार्थिनींच्या रॅगिंगमुळे स्वप्निलचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या पालकांनी केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेडिकल कॉलेजच्या बाथरुममध्ये स्वप्निल बेशुद्ध अवस्थेत आढळून आला.
स्वप्निल हा गायनॅकॉलॉजिच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. मेडिकल कॉलेजच्या वॉशरूममध्ये त्याचा मृतदेह आढळून आला आहे. या प्रकरणी स्वप्नील शिंदेच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केला आहे.
डॉ. स्वप्नील महारुद्र शिंदे याच्या मृत्यू नंतर त्याच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केला आहे. रॅगिंग प्रकरणातून घातपात झाल्याचा आरोप स्वप्नीलच्या नातेवाईकांनी केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मेडिकल कॉलेजमधील दोन मुलींवर आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. रॅगिंग करणाऱ्या दोन मुलींसह कॉलेज प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी करण्यात आली आहे.
स्वप्नीलच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपांनंतर कॉलेज प्रशासनाकडून आरोपांच खंडन केले आहे. कॉलेजच्या डीन यांनी माध्यमांना सांगितले की, स्वप्नीलचे कामात लक्ष लागत नसल्याच्या तक्रारी होत्या. त्याच्यावर मानसोपचारतज्ञांकडून उपचार सुरू होते आम्ही त्याचं समुपदेशन करत होतो. तसेच रॅगिंग प्रकरणी कोणतीही तक्रार नव्हती असंही सांगितले. स्वप्नीलने सहा महिन्यांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार सुद्धा उघडकीस आला आहे. इतकेच नाहीतर आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी त्याने एक सुसाईड नोट लिहिली होती, ज्यामध्ये दोन मुलींची नावे नमूद असल्याचेही वृत्त आहे.