अकलूज : वेळापूर रस्त्यावरील माळेवाडी येथे मालवाहतूक करणारा कंटेनर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात वेळापूर येथील आई छाया पांडुरंग दांडगे (वय ४५ रा.वेळापूर), मुलगी सृष्टी पांडुरंग दांडगे (वय १८) या माय लेकीचा जागीच मृत्यू झाला. दोनजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे. सदर घटनेबाबत अकलुज पोलीसात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत अकलुज पोलीसाकडून मिळालेल्या माहितीनुसार ओंकार पांडुरंग दांडगे (वय २० रा.वेळापूर ) हा आई छाया पांडुरंग दांडगे (वय ४५) आजारी असल्याने आपली बहीण सृष्टी पांडुरंग दांडगे (वय १८) हिच्यासोबत दुचाकीवरून अकलूज येथील दवाखान्यात उपचारासाठी जात असताना माळेवाडी येथील प्राथमिक शाळेजवळ मागून येणाऱ्या मालवाहतूक करणाऱ्या कंटेनर (क्र. KA 01 AH 5951) ने जोरदार धडक दिली. यात छाया दांडगे व सृष्टी दांडगे यांचा जागीच मृत्यू झाला तर ओंकार दांडगे हा गंभीर जखमी झाला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अपघात एवढा भीषण होता की कंटेनर खाली गेलेल्या मायलेकी जवळपास १०० मीटर पर्यंत फरपटत गेल्या. त्यामुळे मृतदेहाच्या अक्षरशः चिंधड्या झाल्या होत्या व रस्त्यावर रक्ताचा सडा व मृतदेहाचे तुकडे पसरले होते. दरम्यान अपघातानंतर परिसरातील व स्थानिक लोकांची गर्दी जमली होती. यामुळे काही काळ अकलूज – वेळापूर रोडवरील वाहतूक खोळंबळी होती. अकलूज पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन वाहतूक सुरळीत करुन जखमीस उपचारासाठी हालवले व मृतदेह शवविच्छदन करण्यासाठी ताब्यात घेतले.
त्याच्यावर अकलूज येथील खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. याबाबत विनोद राजकुमार पवार (रा.वेळापूर) यांनी अकलूज पोलिसात फिर्याद दिली असून कंटेनर चालक शिवशंकर हाजी बसप्पा (वय ४३ रा. नामकल तामिळनाडू ) याला ताब्यात घेण्यात आले आहे. अधिक तपास सपोनि वैभव मारकड हे करीत आहेत.