सोलापूर : एमआयडीसी परिसरातील सरवदे नगर येथे चाकूने केलेल्या मारहाणीत महादेवी प्रभुलिंग कोळी (वय ४५ रा. जयप्रकाश नगर, मुळेगाव रोड) आणि त्यांची विवाहित मुलगी प्रियांका सागर भुयारे (वय २५ रा. तोगराळी ता. दक्षिण सोलापूर) या दोघी जखमी झाल्या. ही घटना आज रविवारी दुपारच्या सुमारास घडली.त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्रियांका भुयारे ही सणासाठी येथे माहेरी (महादेवी कोळी) आली होती.त्या दोघी आज दुपारी सरवदे नगर येथे राहणाऱ्या शिव कोळी या नातेवाईकाकडे गेल्या होत्या. त्यावेळी मल्लिनाथ कोळी हा घरात येऊन त्यांच्यावर चाकूने हल्ला केला त्यात त्या दोघी जखमी झाल्या. या घटनेची नोंद एमआयडीसी पोलिसात झाली असून या मागचे कारण अद्याप समजले नाही.
* युनियन बँकेच्या एटीएम मशीनची तोडफोड
सोलापूर : जुना विडी घरकुल येथे युनियन बँकेच्या एटीएम मशीनमध्ये पैसे चोरी करण्याच्या उद्देशाने मशीनची तोडफोड केल्याची घटना २० ते २१ ऑगस्ट दरम्यान जुना विडी घरकुल सोलापूर येथे घडली.याप्रकरणी राजेश राम कृष्ण बालिंगल (वय-३६,अशोक चौक,सोलापूर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,कुणीतरी अज्ञात चोरट्याने जुना विडी घरकुल परिसरात असलेले युनियन बँकेचे एटीएम मशीनमधील पैसे चोरी करण्याच्या उद्देशाने मशीनची तोडफोड करून दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोसई माळी हे करीत आहेत.