काबूल : अफगाणिस्तानमधील काबूल विमानतळावर बाँबस्फोट होईल, असा इशारा आधीच देण्यात आला होता. त्यामुळे अमेरिकन सैनिक सतर्क होते. मात्र तरीदेखील गुरुवारी रात्री काबूल विमानतळावर तीन बाँबस्फोट झाले. यातील मृतांचा आकडा आता 103 वर पोहोचलाय. अफगाणिस्तानातील आयसिस संलग्न संघटनेने (आयसिस-के) हा हल्ला केल्याचा संशय आहे.
103 मृतांपैकी अमेरिकेच्या 13 सैनिकांचाही समावेश आहे. तर 143 जण गंभीर जखमी झाले आहेत. इस्लामिक स्टेटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
विमानतळाबाहेर झालेल्या दोन आत्मघाती स्फोटांत 60 जण ठार झाले असून, किमान 140 जण जखमी झाले. तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर देशाबाहेर पडण्यासाठी लाखो नागरिकांची धडपड सुरू असताना गुरुवारी काबूल विमानतळ स्फोटांनी हादरले. देशाबाहेर पलायनासाठी काबूल विमानतळावर हजारोंनी गर्दी केली आहे.
या गजबजलेल्या विमानतळाच्या प्रवेशद्वारावर एक आणि विमानतळाबाहेरील एका हॉटेलजवळ एक असे दोन आत्मघाती स्फोट झाले. स्फोटांमुळे विमानतळावर एकच गोंधळ उडाला. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने सर्वप्रथम स्फोटांतील मृत आणि जखमींबाबत माहिती दिली आहे. तालिबानने या हल्ल्याचा निषेध केला आहे. अफगाणिस्तानातील आपापल्या देशांच्या नागरिकांना सुखरूप परत आणण्याची अनेक देशांची मोहीम काबूल विमानतळावर अंतिम टप्प्यात आहे.