मुंबई : पूर्वाश्रमीचे भाजपामंत्री आणि सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते – एकनाथ खडसे यांच्यामागे लागलेला चौकशीचा ससेमिरा सुरूच आहे. आता ईडीने खडसे यांची जळगाव व लोणावळ्यातील मालमत्तात जप्त केली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेची किंमत सुमारे ५ कोटी इतकी आहे.
पुणे जिल्ह्यातील भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळ्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. एकनाथ खडसे हे भाजपमध्ये मंत्री असताना भोसरी एमआयडीसी भूखंड गैरव्यवहार प्रकरण पुढं आलं होतं. या प्रकरणात खडसे यांना मंत्रिपद गमवावं लागलं. त्यानंतर अनेक वर्षे खडसे राजकीय विजनवासात होते. मागील वर्षी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे ३.१ एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप २०१६ मध्ये झाला होता. ३१ कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ ३.७५ कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे.
पक्षप्रवेशानंतर ईडीच्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. मागील महिन्यात ईडीनं त्यांची तब्बल ९ तास चौकशी केली होती. खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्यावर अटकेची कारवाई देखील झाली आहे. आता याच प्रकरणात खडसे यांच्या मालमत्तेवर ईडीनं टाच आणली आहे. भाजप सरकारच्या काळात महसूलमंत्री असताना खडसे यांनी भोसरी एमआयडीसी येथील एक भूखंड तीन कोटी ७५ लाख रुपयांना खरेदी केला होता. तेव्हापासून खडसे व त्यांचे कुटुंबीय या प्रकरणात अडकले आहेत.